Thursday, March 12, 2026
Latest:
करमाळा

करमाळा पंचायत समिती सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या पूजा ढेरे, उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. अजित विघ्ने; यांची निवड. भाजप-राष्ट्रवादी युतीची सत्ता*

करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या वीट गणातून मताधिक्याने निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्या पूजा सचिन ढेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी केतुर गणातून बहुमताने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ॲड. अजित सर्जेराव विघ्ने यांची निवड करण्यात आली. करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीमुळे पंचायत समितीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीची सत्ता स्थापन झाली आहे.
सभापती व उपसभापती पदासाठी आयोजित बैठकीस पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या निवडणूक प्रक्रियेसाठी अध्याशी अधिकारी लक्ष्मण कसेकर सचिव म्हणून गटविकास अधिकारी अमित कदम यांनी निवडणूक प्रक्रियेस सहकार्य केले. यावेळी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे उपस्थित होत्या. नियोजित कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज स्वीकृती, छाननी आणि निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली व दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पंचायत समितीत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ लक्षात घेता दोन्ही पक्षांनी युतीच्या माध्यमातून सभापती व उपसभापती पदाची निवड निश्चित केली. सत्तेचे समान वाटप या सूत्रानुसार सभापतीपद भारतीय जनता पक्षाला तर उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार सभापतीपदी पूजा सचिन ढेरे तर उपसभापतीपदी ॲड. अजित सर्जेराव विघ्ने यांची निवड जाहीर करण्यात आली.
दरम्यान, सभापतीपदासाठी आमदार नारायण  आबा पाटील यांचे बंधू माजी सभापती अतुल पाटील यांच्या पत्नी आदिती पाटील यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता. मात्र पंचायत समितीतील संख्याबळ भाजप-राष्ट्रवादी युतीकडे असल्याने अखेर या निवडणुकीत सत्ताधारी युतीचा विजय निश्चित झाला आणि त्यानुसार सभापती व उपसभापती पदांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी युवा नेते दिग्विजय बागल विलासराव घुमरे सर प्रा. शिवाजी बंडगर सर पंचायत समिती सदस्य गण हिसरे भरत आवताडे पंचायत समिती गण चिखलठाण वनमाला सरडे वांगी पंचायत समिती गण सोनाली तकिक कोर्टी पंचायत समिती गण नाना झाकणे साडे गण दशरथ घाडगे रावगाव पंचायत समिती गण संध्या कांबळे उमरड पंचायत समिती गण आदिती पाटील जेऊर पंचायत समिती गण ललिता शिरस्कर पांडे गण स्वप्निल काळे केम पंचायत समिती गण ज्ञानेश्वर बिचितकर उपस्थित होते.
केतुरला तब्बल १९ वर्षांनंतर उपसभापतीपदाचा बहुमान मिळाला असून, केतुर गणाचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. अजित सर्जेराव विघ्ने यांना ही संधी मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान माजी आमदार संजयमामा शिंदे व भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप-राष्ट्रवादी युती करून ही निवडणूक लढवली होती. या युतीमुळे पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.
नव्याने निवडून आलेल्या सभापती पूजा ढेरे व उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांचे विविध मान्यवर व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, माजी आमदार संजयमामा शिंदे मार्गदर्शक विलासराव घुमरे तसेच युवा नेते दिग्विजय बागल भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडीमुळे करमाळा तालुक्यातील पंचायत समितीच्या कारभाराला नवे नेतृत्व मिळाले असून ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रभावी काम केले जाईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!