Thursday, March 12, 2026
Latest:
करमाळा

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार” यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन; जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विविध कार्यक्रम

करमाळा प्रतिनिधी : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रतिमापूजन, व्याख्यान तसेच वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला.
महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहात १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
जयंतीनिमित्त “यशवंतराव चव्हाण : जीवन व कार्य” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील सुमारे वीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले. या स्पर्धेत कु. शिवांजली कुदळे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक कु. नेहा मचाले आणि तृतीय क्रमांक कु. संजना मारडकर हिने मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक श्री. विश्वभर लांडगे व कु. शबाना पठाण यांना प्रदान करण्यात आले. सर्व विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी “यशवंतराव चव्हाण : जीवन व कार्य” या विषयावर डॉ. मुक्ता काटवटे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक योगदान अधोरेखित केले. महाराष्ट्राच्या घडणीत त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार, शिक्षण, औद्योगिक विकास आणि लोकाभिमुख प्रशासन यामध्ये चव्हाण यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. माने होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समाजकार्यात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. चारू देवकर व प्रा. विष्णू शिंदे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार डॉ. वंदना भाग्यवंत यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!