Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळा

करमाळा शहरातील नामांकित शाळेत RTE विद्यार्थ्यांकडून पुस्तकांसाठी फी वसुलीचा आरोप; पालकाची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

करमाळा प्रतिनिधी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (RTE) कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व पाठ्यपुस्तके देण्याची तरतूद असतानाही करमाळा येथील एका खासगी शाळेत RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून पुस्तकांच्या नावाखाली फी वसुली होत असल्याचा आरोप पालकाने केला आहे. याबाबत संबंधित पालकाने जिल्हा परिषद सोलापूर येथील शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
करमाळा येथील एस.टी. कॉलनी परिसरात राहणारे पालक विशाल सिद्धेश्वर गुळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलीने RTE अंतर्गत शहरातील एका शाळेत प्रवेश घेतला असून ती सध्या इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. RTE कायद्यानुसार इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याबरोबरच पाठ्यपुस्तके व आवश्यक शैक्षणिक साहित्य विनामूल्य देणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित शाळेकडून पुस्तकांच्या नावाखाली किंवा इतर कारणे सांगून फी आकारली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. उलट शाळेतील मुख्याध्यापकांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असून RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या पालकांशी अयोग्य भाषेत संवाद साधला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच “हा कायदा आम्हाला लागू नाही” अशा स्वरूपाची भाषा वापरली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेकडून विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी फी तात्काळ थांबवावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच पालकांची होणारी पिळवणूक व शासनाची संभाव्य फसवणूक रोखावी, अशी मागणी पालक विशाल गुळवे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. तक्रारीसोबत फी पावतीची छायांकित प्रतही जोडण्यात आल्याचे समजते.
या प्रकरणाची माहिती राज्याचे मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे तसेच करमाळा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी होणार का, याकडे पालकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!