Friday, March 20, 2026
करमाळा

संगमनेर तालुक्यातील चिमुकलीवर ॲसिड हल्ला; आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणार– मनोज बुऱ्हाडे

 

करमाळा प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या कु. ईश्वरी डहाळे या निरपराध चिमुकलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला असून या अमानुष घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. समाजातील विविध स्तरांतून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
सराफ सुवर्णकार संरक्षण समिती प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ बुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सराफ सुवर्णकार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष मनोज बुराडे यांच्या पुढाकारातून सर्व समाज बांधव, सुवर्णकार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही साध्या कुटुंबातील असून शिक्षण घेत असताना तिच्यावर हा भयंकर हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांमध्ये व पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात आरोपींना त्वरित अटक करून भारतीय दंड संहितेअंतर्गत कडक गुन्हे दाखल करावेत, तसेच प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, पीडित मुलीला शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत, मोफत उच्चस्तरीय वैद्यकीय उपचार आणि मानसिक समुपदेशन देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच, ॲसिड विक्रीवर कडक निर्बंध लावून परवाना प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष जनजागृती मोहिमा राबविण्याची गरज व्यक्त करत, पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात तात्काळ व ठोस कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालून न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असा इशारा मनोज बुराडे यांनी दिला आहे.
या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!