कॉसमॉस बँक पुणेचे चेअरमन ॲड. श्री.प्रल्हाद (बापु ) भिमराव कोकरे गावकऱ्यांतर्फे होणार सन्मान”खातगाव-रत्न” पुरस्काराने होणार सन्मानीत- ॲड. रविंद्र कोकरें
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील खातगाव हे पुनर्वसित गावठाण.. पुनर्वसनाने खातगाव हे गाव एक,दोन व तीन अशा विभागात विखुरलेले आहे. ग्रामिण भागातील या छोट्याशा गावात माननीय एडवोकेट श्री.प्रल्हाद (बापू )भीमराव कोकरे यांचा जन्म झाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील खातगाव या गावी शेतकरी कुटुंबातील हा पोरगा पुण्यातील कॉसमॉस बँकेचे चेअरमनपद यशस्वीपणे सांभाळत आहे. शेतकरी कुटुंबातील असलेमुळे बापूंना लहानपणापासूनच शेती आणि सामाजिक कार्याची आवड होती. बापूंचे वडील कै.भीमराव गोविंद कोकरे हे खातगाव या गावचे पहिले सरपंच होते. खातगाव व परिसरामध्ये तसेच आप्तस्वकीयांमध्ये ते बापू या नावाने परिचित असून माननीय बापूंचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांचे मामाचे गावी मौजे झारगडवाडी तालुका बारामती, जिल्हा पुणे तसेच बारामती सारख्या विकसित शहरांमध्ये झालेले आहे. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुणे येथे जाऊन त्यांनी बीएससी ऍग्री (कृषी पदवी) व एम एस सी ऍग्रीपर्यंत शिक्षण घेतले सदर शिक्षण घेत असतानाच माननीय बापू हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा देखील अभ्यास करीत होते. साधारणपणे सन 1966 च्या दरम्यान ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन “असिस्टंट रजिस्टर सहकारी संस्था” या पदावर विराजमान झाले. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांची “जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था”या पदावर बढती झाली.मान.बापूंनी जिल्हा उपनिबंधक म्हणून सोलापूर,पुणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी काम केलेले आहे. सदर काम करीत असताना त्यांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना नेहमी अत्यंत चांगली वागणूक देत प्रोत्साहित केले. कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.बापू यांना नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड होती. जिल्हा उपनिबंधक असताना त्यांनी कायद्याची देखील पदवी संपादन केली. योग्य मार्गदर्शन करून त्यांनी त्यांच्या सोबतचे काही ज्युनिअर ऑफिसर यांना प्रोत्साहित करत सहकार खात्यामध्ये उच्च पदावर बसवले आहे. माननीय बापू हे “जॉईंट रजिस्टर सहकारी संस्था” या उच्च पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. माननीय बापू यांनी सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्यकाळामध्ये व बँकेवर संचालक असताना कित्येक गरजू आणि होतकरू तरुणांना सहकार बँकिंग सरकारी व आयटी क्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रामध्ये नोकरी मिळून देण्याचे काम केले. काही तरुणांना व्यवसाय, उदयोग करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्याकडे काम घेऊन जाणाऱ्या माणसांना ते काही ना काही नियमित देत असतात. खरं तर बापुंच्या कार्याचा ठसा खुप मोठा आहे. त्यांचे सामाजिक कार्य देखील निरंतरपणे चालूच आहे. बापूंनी त्यांच्या कार्यकाळात काही तोट्यात गेलेल्या सहकारी संस्था देखील सुस्थितीत आणून आज चांगले अवस्थेत त्या उभ्या करण्याचे काम केले आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची टाकळी या गावांमध्ये शाखा आणण्याचे काम देखील बापूंनी त्यांच्या कार्यकाळात केले. तसेच आपल्या खातगाव मध्ये विविध कार्यकारी विकास सोसायटीची स्थापना देखील माननीय बापूंनी केलेली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल विविध संघटनांनी घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देखील दिलेले आहेत. सन 2004 साली बापू कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे या बँकेच्या संचालक पदी निवडून आले. सन 2004 पासून आज पर्यंत ते अनेक वेळा बिनविरोध निवडून आलेले असून त्यांनी सन 2019 चे 2021 या कालावधीमध्ये दि.कॉसमास को-ऑपरेटिव्ह बँक पुणे चे व्हाईस चेअरमन पदी काम केलेले आहे.आता सध्या ते सन 2024 25 च्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आले आणि त्यांची चेअरमन म्हणून एकमताने निवड करण्यात आलेली आहे. असा सर्व गुणसंपन्न, शेती ,सहकार ,बँकिंग, कायदा ,सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्राचा गाढा अभ्यास असणारा माणूस म्हणजे आपले आदरणीय बापू आहेत. आदरणीय बापू हे आपल्या खातगाव गावचे सुपुत्र आहेत याचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे. आणि याच त्यांच्या सर्व कार्याचा गौरव म्हणून आज खातगाव. ता- करमाळा मध्ये बापूंचा “खातगाव भूषण” या पुरस्काराने गौरव होत आहे. बापू या पुरस्काराचे खऱ्या अर्थाने हक्कदार असुन खातगाव ग्रामस्थांतर्फे आज मौजे. खातगाव नं-१ येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. आज शनिवार दिनांक-२१/०३/२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळात हा सोहळा होत असुन, हभप गुरुवर्य आत्माराम महाराज कुटे( शास्त्री) आळंदी यांचे शुभहस्ते सर्व गावकऱ्यांचे उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे. या बाबतची सविस्तर माहिती ॲड. रविंद्र कोकरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


