केतुर येथील दत्तकला आयडियल स्कूलचा स्पर्धा परीक्षांमध्ये झंझावाती यश
केतुर, प्रतिनिधी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, केतुर नं. १ येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा लौकिक उंचावला आहे.
शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख करून देण्यासाठी मंथन, स्कॉलरशिप, नवोदय, गुरुकुल तसेच गणित मंडळाच्या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवून त्यांची नियोजनबद्ध तयारी करून घेतली जाते. याच शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे यंदाच्या निकालात प्रत्यंतर आले आहे.
१८ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी अनन्या अंबादास मिंड हिने यश मिळवून २६ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर येथे होणाऱ्या गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे. गणित प्राविण्य परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनाच पुढील टप्प्यासाठी संधी मिळत असल्याने हे यश विशेष मानले जात आहे.
दरम्यान, गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता सहावीचा विद्यार्थी वेदांत संजय बाबर याने ३०० पैकी १९२ गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच इयत्ता चौथीची विद्यार्थिनी शिवकन्या रामहरी मोरे हिने ३०० पैकी २०० गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
नवोदय विद्यालय समितीमार्फत घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादन केले. स्वरूप रवींद्र राऊत (१०० पैकी ९५ गुण), अनन्या अंबादास मिंड (१०० पैकी ८८.७५ गुण) आणि माऊली सिद्धेश्वर गोडगे (१०० पैकी ७६.२५ गुण) यांनी उत्तम गुण मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक होत आहे. शाळेचे प्राचार्य विजय मारकड यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि पालकांचा पाठिंबा मिळाल्यास विद्यार्थी मोठी यशे मिळवू शकतात.” शाळेमध्ये नियमित सराव परीक्षा, मार्गदर्शन सत्रे आणि स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते, असेही त्यांनी नमूद केले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ, सचिवा माया झोळ, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, स्कूल डायरेक्टर नंदा ताटे, प्राचार्य विजय मारकड, परीक्षा प्रमुख रवींद्र बाबर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


