करमाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई सोन्याची साखळी हिसकावणाऱ्या सराईत आरोपीस अटक; १लाख पत्तीस हजारांचे सोने जप्त
करमाळा, दि. २६ (प्रतिनिधी) – करमाळा शहरात भरदिवसा घडलेल्या साखळी हिसकावण्याच्या गुन्ह्याचा करमाळा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला असून सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १ लाख ३५ हजार ८२८ रुपये किंमतीचे १०.७८० ग्रॅम वजनाचे अर्धवट सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ मार्च २०२६ रोजी मिना माणिक मैड (रा. शेलगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) या प्रकृती अस्वास्थ्यामुळे करमाळा येथे आपल्या मुलाकडे विश्रांतीसाठी आल्या होत्या. सायंकाळी सुमारे ५.३० वाजता त्या मंगळवार पेठेतील घाडगे यांच्या दवाखान्याकडे पायी जात असताना महादेव मंदिर परिसरात दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरून त्यांच्या जवळ आले.
या वेळी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे १.७५ तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले. हे गंठण सुमारे २ लाख ५३ हजार ७५० रुपये किंमतीचे होते. घटनेनंतर आरोपी काळ्या रंगाच्या युनिकॉर्नसारख्या मोटारसायकलवरून जुन्या बायपासच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. दोन्ही आरोपींनी चेहरे रूमालाने झाकले होते, तसेच एकाने फिकट रंगाची तर दुसऱ्याने मिलिटरी रंगाची टोपी घातली होती.
या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीची ओळख पटली.
त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने लखन उर्फ फिरोज अजिज शेख (रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १०.७८० ग्रॅम वजनाचे अर्धवट सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले.
दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. उर्वरित चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नेवासा व तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, चोरी, मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने ही कामगिरी बजावली आहे.


