अनागोंदी कारभाराविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; माहिती न दिल्यास जिल्हा संघटक गणेश कुकडे यांचा उपोषणाचा इशारा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध शासकीय विभागांमधील कथित अनागोंदी कारभाराविरोधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. संबंधित विभागांकडून पारदर्शक माहिती तात्काळ न दिल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हा संघटक गणेश कुकडे यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालय, उपाधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे विविध कामांबाबत माहिती मागवण्यात आली आहे. या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीने कामे होत असल्याचा आरोप संघटनेने केला असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुरवठा विभागाकडील रेशनकार्ड माहिती, गोडाऊन कंत्राटे, धान्य पुरवठा यासंदर्भातील तपशील, भूमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी प्रक्रिया, प्रॉपर्टी कार्ड संदर्भातील कामकाज, जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या विंधन विहिरी, रस्ते काँक्रीटीकरण आणि शेततळे यासंबंधीच्या तक्रारींची माहिती मागवण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तालुक्यात करण्यात आलेल्या डांबरी व काँक्रीट रस्त्यांची गुणवत्ता, तसेच सरकारी झाडे रंगवण्याच्या निविदांबाबतही सविस्तर माहितीची मागणी करण्यात आली आहे.
संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे की, या सर्व कामांमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने माहिती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा व्यापक आंदोलन छेडले जाईल.
दरम्यान, मागितलेली माहिती वेळेत न दिल्यास उपोषणासारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे. या भूमिकेमुळे करमाळा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.


