करमाळा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग गणरायाच्या कृपेने वरुण राजा बरसला
केत्तूर ( अभय माने) संपूर्ण करमाळा तालुक्यात बुधवारी (ता.7) रात्री वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला.यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात पाणी साठून राहिल्याने पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.केत्तूर पारेवाडी रेल्वे स्टेशन येथील नवीन रेल्वे भुयारी मार्गात पाच ते सहा फूट पाणी साचून राहिल्याने व दिवसभर ते तसेच राहिल्याने शाळकरी विद्यार्थी तसेच वृद्ध व इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागला तर दुचाकी चार चाकी वाहने मात्र बारा किलोमीटरचा वळसा घालून त्यांना यावे लागले. भुयारी मार्गामुळे गावाचा संपर्क मात्र तुटला होता.त्यातच रात्रभर वीज गुल राहिल्याने सर्वांना उकाडा सहन करावा लागला.
गेली 4/5 दिवसापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे बळीराजा कधी एकदाच पाऊस उघडतोय याची वाट पाहत आहे.दरवर्षी परतीच्या पावसाकडे येथील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो, मात्र यावेळेस जून महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली.यामुळे नजीकचे नदी, नाले, तलाव तुडूंब भरून वाहत आहेत .
असे असताना आता परतीचा पाऊस कमी होईल अशी शक्यता वाटत होती मात्र परतीचा पाऊस तर रोजच नित्यनियमाने बरसत आहे.बुधवारी रात्रभर कमी जास्त प्रमाणात ब्रेक के बाद पाऊस होत होता. यामुळे नजीकच्या वाशिंबे,पोमलवाडी, जिंती, टाकळी या परिसरातील शेतकऱयांचा डाळिंब,टोमॅटो,केळी,यासारख्या शेतातील बागांमध्ये पाणी साठून राहिल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.तसेच शेतात तणही मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याला वेळीच काढण्याची आवश्यकता आहे.परंतु पाऊस आता थांबणार कधी याची शेतकरी वाट पाहत आहे.
खरीपातील पावसाच्या भरवश्यावरील पिके हाती लागण्याची खात्री नसली, तरी रब्बीतील पिके हमखास हाती लागत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.आज गुरुवारी दिवसभरही पावसाची रिमझिम चालूच होती
