करमाळ्याच्या यश अडकरची न्यूयॉर्क विद्यापीठात झेप; ८० लाखांच्या शिष्यवृत्तीसह AI अभ्यासासाठी निवड, विविध सामाजिक संघटनांकडून भव्य सत्कार
करमाळा, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील जागतिक स्तरावर आपली प्रतिभा सिद्ध करू शकतात, याचा प्रत्यय करमाळा तालुक्यातील यश श्रीपाद अडकर याने आणून दिला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि मशीन लर्निंग या अत्याधुनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची न्यूयॉर्क येथील स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून त्याला तब्बल ८० लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल कर्जत (जि. अहिल्यानगर) येथील विविध सामाजिक संघटना, शिक्षणप्रेमी नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा भव्य सत्कार करण्यात आला.
यश अडकर हा शिक्षक श्रीपाद अडकर यांचा सुपुत्र असून लहानपणापासूनच त्याने शैक्षणिक गुणवत्तेसोबत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष रुची जोपासली. त्याने प्राथमिक शिक्षण नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल येथे आठवीपर्यंत पूर्ण केले. त्यानंतर आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण येथे नववी व दहावीचे शिक्षण घेतले. पुढे बारामती येथील अजितदादा इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण करत त्याने उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने अनेक शैक्षणिक स्पर्धा, उपक्रम आणि तांत्रिक प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करताना यशने विविध संशोधनात्मक आणि तांत्रिक प्रकल्पांवर काम केले आहे. डेटासेट हाताळणी, मशीन लर्निंग मॉडेल्सचे प्रशिक्षण, मॉडेल बायसचे विश्लेषण, डेटा सायन्स आणि मॉडेल डिप्लॉयमेंट यामध्ये त्याने विशेष प्रावीण्य मिळवले आहे. त्याच्या नाविन्यपूर्ण विचारसरणीमुळे आणि संशोधनवृत्तीमुळे त्याची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांनी विशेष दखल घेतली आहे.
याशिवाय तो ‘अल्फोरिया’ (Alphoria) या AI आधारित तंत्रज्ञान प्रकल्पाचा संस्थापक व मुख्य विकसक असून, सामान्य नागरिकांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे पोहोचविण्यासाठी विविध तांत्रिक साधने विकसित करण्याचे कार्य करीत आहे. AI चा समाजोपयोगी वापर वाढविण्यासाठी त्याने अनेक अभिनव संकल्पना विकसित केल्या असून त्यांचे सादरीकरण विविध मंचांवर केले आहे.
यशने लीनिअर रिग्रेशन, न्यूरल नेटवर्क आणि इतर आधुनिक मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वी केले आहेत. पुरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील धोकादायक घरांची ओळख पटविण्यासाठी त्याने विकसित केलेला प्रोटोटाइप विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच मार्केट रिसर्च, SWOT Analysis, AI आधारित इमेज प्रोसेसिंग आणि डेटा अॅनालिटिक्स क्षेत्रातही त्याने उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्याच्या शैक्षणिक आणि तांत्रिक गुणवत्तेची दखल घेत त्याला एपी स्कॉलरशिप पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी पुरस्कार, ग्लोबल इन्स्टिट्यूट एक्सलन्स स्टुडंट पुरस्कार यांसह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रम, अप्रेंटिसशिप आणि संशोधन उपक्रमांमध्येही त्याने सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
यशच्या या जागतिक यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभात विश्वकर्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद डोकरीकर यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्वेसर्वा सुनीता कन्हैयालाल देवी यांनीही यशचे अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातून जागतिक शैक्षणिक विश्वात झेप घेणाऱ्या यश अडकरच्या या यशामुळे करमाळा, बारामती, कर्जत आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याची ही कामगिरी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, मेहनत, जिद्द, सातत्य आणि गुणवत्तेच्या बळावर जागतिक स्तरावर यश संपादन करता येते, हे त्याने सिद्ध करून दाखविले आहे. त्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही जागतिक शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्याची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.


