Uncategorized

शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू शाळेच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी; मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनतर्फे सन्मान

करमाळा : प्रतिनिधी — करमाळा शहरातील कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. या गुणवंत विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थिनींना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने फाउंडेशनने घेतलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
इयत्ता पाचवी तसेच सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या आलीना मझहर पठाण, अक्सा सिकंदर मुलाणी, अशनूर मोहसीन शेख आणि अलमीजा अनिस कुरेशी या विद्यार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांच्या जोरावर या विद्यार्थिनींनी मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक संजय सावंत होते. शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जानवडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच नियमित अभ्यास, योग्य नियोजन आणि सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात नगरसेवक संजय सावंत यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशावर समाधान न मानता भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि विविध क्षेत्रांत आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला सामाजिक संस्थांकडून मिळणारे प्रोत्साहन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर पत्रकार नासिर कबीर आणि उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य वेळी प्रोत्साहन मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून अशा सत्कार समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. तसेच इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, मजहर शेख, जुबेर सय्यद, पत्रकार नासिर कबीर, पत्रकार अलीम शेख, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, तहसील कार्यालयातील कर्मचारी जहांगीर शेख, इलियास शेख, मौलाना कादर शेख, मोहसीन शेख, अनिस कुरेशी, फैजान शेख, निगार मुंडेवाडी, नाझिया मनुर, फरहाना पठाण, यास्मिन पठाण, आरिफा मोमीन, कौसर हन्नुरे, गजाला मोमीन आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. आर्थिक किंवा अन्य परिस्थिती कोणतीही असो, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यात मोठे यश मिळविण्याची प्रेरणा मिळते. मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनने आयोजित केलेला हा सत्कार सोहळा याच सकारात्मक विचारांचे उदाहरण ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी जुबेर सय्यद यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पाहुण्यांचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!