Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळा

अधिक मासानिमित्त सोहम महिला मंडळाची गोसेवा गुरु गणेश दिव्यरत्न गौ-पालन संस्थेस चारा व गोळीपेंड दान; धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे शहरातून कौतुक

करमाळा : प्रतिनिधी
पवित्र अधिक मासानिमित्त सोहम महिला मंडळ, राशीन पेठ (करमाळा) यांच्या वतीने नगर रोडवरील गुरु गणेश दिव्यरत्न गौ-पालन संस्थेस सदिच्छा भेट देऊन गोमातेस चारा, गोळीपेंड दान करण्यात आली. यावेळी महिला सदस्यांनी प्रत्यक्ष गोमातेस चारा खाऊ घालत गोसेवेचा अनोखा उपक्रम राबविला.
करमाळा शहरात धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या सोहम महिला मंडळाने अधिक मासाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित केला होता. मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी गौ-पालन संस्थेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही गोसेवेसाठी कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
गुरु गणेश दिव्यरत्न गौ-पालन संस्थेमध्ये सध्या सुमारे नव्वद देशी गायींचे संगोपन व सेवा केली जाते. अधिक मासानिमित्त महिला सदस्यांनी संस्थेच्या परिसरातील गुरु गणेश ध्यान केंद्रात नामस्मरण, स्तोत्र पठण व भक्तिमय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यामुळे संपूर्ण गोशाळा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी सर्व महिलांनी गोमातेस हळदी-कुंकू वाहून ओवाळणी केली. तसेच नैवेद्य अर्पण करून गायींची पूजा करत त्यांचे आशीर्वाद घेतले. धार्मिक श्रद्धा आणि गोसेवा यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
दरम्यान, सोहम महिला मंडळाने अधिक मासानिमित्त राशीन पेठ येथे ७ जूनपासून भव्य भागवत कथांचे आयोजन केले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. धार्मिक संस्कार आणि समाजजागृतीच्या दृष्टीने मंडळाचे हे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
गौ-पालन संस्थेस चारा दान दिल्याबद्दल माजी नगरसेविका संगीता खाटेर, मोक्षा खाटेर तसेच कालदाते परिवार यांच्या वतीने महिला मंडळाच्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानून धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
सोहम महिला मंडळ, राशीन पेठ हे मंडळ सातत्याने विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवत असून त्यांच्या कार्याचे करमाळा शहरासह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!