Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळा

पर्यावरण संवर्धनासाठी करमाळा नगरपरिषदेचा पुढाकार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज महावीर उद्यानात वृक्षारोपण- सचिन तपसे

करमाळा, प्रतिनिधी : पर्यावरणाचा समतोल राखणे, शुद्ध हवेचे संवर्धन करणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि नागरिकांना निरोगी जीवन देणे या उद्देशाने करमाळा नगरपरिषदेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज, दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महावीर उद्यान येथे हा उपक्रम पार पडणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दिली.
सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, तापमानवाढ, घटणारी वृक्षसंख्या आणि पर्यावरणीय असमतोल ही गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच हरित करमाळा घडविण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेने या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन आणि संगोपन करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, शुद्ध हवा, पावसाचे संतुलन, जलसंवर्धन आणि उत्तम आरोग्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली असल्याचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी नमूद केले.
कार्यक्रमात नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी नागरिक तसेच विविध संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
करमाळा शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!