करमाळा पोलिस प्रशासन वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज युनिव्हर्सल करीअर ॲकडमीच्या विद्यार्थ्यांसह संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी रायगाव ते जेऊरपर्यंत विशेष सुरक्षा व वाहतूक नियोजन –पोलीस निरीक्षक रणजित माने
करमाळा, प्रतिनिधी :
आषाढी वारीनिमित्त श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा शनिवार, दि. १८ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्याची सीमा ओलांडून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचा मार्ग सुरक्षित, सुकर आणि सुरळीत ठेवण्यासाठी करमाळा पोलिस प्रशासन, युनिव्हर्सल करिअर अकॅडमीचे विद्यार्थी तसेच तालुक्यातील विविध पोलीस भरती अकॅडमी सज्ज झाल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे रायगाव येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने स्वागत करण्यात येते. हलग्यांचा कडकडाट, अबीर-गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जातो.
रविवार, दि. १९ जुलै रोजी पालखी करमाळा शहरातील सुभाष चौक येथे भाविकांच्या दर्शनासाठी काही काळ थांबणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने पोलिस प्रशासनाने विशेष सुरक्षा आराखडा तयार केला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
सुभाष चौक ते झरे फाटा या मार्गावर युनिव्हर्सल करिअर अकॅडमीचे विद्यार्थी पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि वारकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. तर झरे फाटा ते जेऊरपर्यंत पोलिस प्रशासनासह तालुक्यातील विविध पोलीस भरती अकॅडमीचे विद्यार्थी सुरक्षा व्यवस्थेत सहभागी होणार आहेत.
“आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भक्तीचा महोत्सव आहे. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, पालखी सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा आणि स्वयंसेवक सज्ज आहेत,” असे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सांगितले.
युनिव्हर्सल करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सेवाभावी सहभाग आणि पोलिस प्रशासनाचे नियोजन यामुळे यंदाचा संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.


