शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे; दहिगाव योजनेचे आवर्तन तातडीने सोडा” – भरत भाऊ आवताडे पाणीप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक; आंदोलनाचा इशारा
करमाळा, प्रतिनिधी :
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप व ऑक्टोबर फेरीचे आवर्तन तातडीने सुरू करून उन्हाळी आवर्तनापासून वंचित राहिलेल्या गावांना प्राधान्याने पाणी द्यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत भाऊ आवताडे यांनी दिला आहे.
यासंदर्भात कुुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२ चे उपविभागीय अधिकारी यांना भरत भाऊ आवताडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात दहिगाव उपसा सिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या गावांच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि यंदाच्या खरीप हंगामात कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड उपस्थित होते.
निवेदनानुसार, दहिगाव उपसा सिंचन योजना ही उजनी धरणावर अवलंबून असून सध्या धरणात सुमारे ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, २०२६ च्या उन्हाळी आवर्तनात अनेक गावांना पाणी मिळाले नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि आंदोलने करूनही संबंधित गावांना पाणी देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भरत भाऊ आवताडे यांनी प्रशासनाकडे मागणी करताना सांगितले की, “उन्हाळी आवर्तनात वंचित राहिलेल्या गावांवर पुन्हा अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.”
दरम्यान, खरीप हंगाम सुरू असताना पाण्याअभावी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिकांचे नियोजन आणि सिंचन व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
“शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्यास तयार आहोत,” असा निर्धारही भरत भाऊ आवताडे यांनी व्यक्त केला.


