कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी हनुमंत चांदणे यांची बिनविरोध निवड ‘कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी देण्याचा जगताप घराण्याचा संस्कार’- माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा, प्रतिनिधी :
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील रिक्त असलेल्या संचालक पदावर वीट येथील निष्ठावंत कार्यकर्ते हनुमंत चांदणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे वीट गावासह जगताप समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली हनुमंत चांदणे यांच्या निवडीचा ठराव मंजूर करण्यात आला. या निवडीस जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी अधिसूचनेद्वारे मान्यता दिली आहे.
निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले, “देशभक्त कै. नामदेवराव जगताप साहेब आणि कै. आण्णासाहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सर्वसामान्यांतील कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी देण्याचा संस्कार माझ्यावर आहे. म्हणूनच जगताप गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते हनुमंत चांदणे यांची बाजार समितीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. पदावर बसून नेता बनण्यापेक्षा जनतेचे पाईक, दास आणि सेवक बनून काम करावे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक हनुमंत चांदणे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे आभार मानत, “माझ्यासारख्या दलित समाजातील कार्यकर्त्याला तालुका पातळीवर शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिली. माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करेन,” अशी ग्वाही दिली.
वीट गावाला प्रथमच बाजार समितीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे आभार मानले. या निवडीमुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना राजकीय आणि सहकार क्षेत्रात संधी देण्याची जगताप गटाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत, जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, प्रशांत पाटील, पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, बाजार समितीच्या उपसभापती सौ. शैलजा मेहेर, युवा नेते शंभूराजे जगताप, नवनाथ बापू झोळ, रामदास गुंडगिरे, सागर दोंड, मनीषा देवकर, जनार्दन नलवडे, मधूकर गाडे, महादेव कामटे, काशिनाथ काकडे, कुलदीप पाटील, परेशकुमार दोशी, नारायण बापू जगताप, महादेव डुबल, शहाजी शिंगटे, दादासाहेब लबडे यांच्यासह वीट ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी आणि तालुक्यातील विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत, युवा नेते शंभूराजे जगताप, ॲड. अजित विघ्ने, गणेश चिवटे, नवनाथ झोळ, देविदास ढेरे, महेश गणगे आणि विनय ननवरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय भागडे यांनी केले, तर आभार उपसभापती बबनराव मेहेर यांनी मानले.


