श्रावणात ‘हर हर महादेव’चा जयघोष; करमाळ्याचे श्री खोलेश्वर महादेव मंदिर भक्तीने उजळले पुरातन वास्तू, रथोत्सव आणि शिवनाम सप्ताहाची परंपरा आजही कायम
करमाळा प्रतिनिधी
श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र महिन्यात करमाळा शहरातील शिवमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. करमाळा शहराला प्राचीन धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून, या वारशात किल्ला विभागातील श्री खोलेश्वर महादेव मंदिराचे स्थान विशेष आहे. राजे राव रंभा निंबाळकर यांच्या कारकिर्दीत उभारण्यात आलेल्या पुरातन मंदिरांच्या परंपरेतील हे मंदिर आजही करमाळकरांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तीने उजळून निघतो.
श्री खोलेश्वर महादेव मंदिराची वास्तुरचना अत्यंत रेखीव आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरातील दगडी बांधकाम, मजबूत खांब, नक्षीकाम आणि कलाकुसर यामधून प्राचीन स्थापत्यकलेची झलक पाहायला मिळते. मंदिराच्या वास्तुरचनेत देवीचा माळ परिसरातील मंदिराशी साधर्म्य असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. या परिसरात महादेवासोबत विष्णू आणि महेश यांची स्वतंत्र मंदिरे असल्याचेही सांगितले जाते. देवीचा माळ येथील विष्णू मूर्ती, वेशीतील महादेवाची पिंड आणि किल्ला विभागातील श्री गणेश मूर्ती एकाच प्रकारच्या दगडापासून बनविल्या असल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्री खोलेश्वर मंदिराचा धार्मिक इतिहासाबरोबरच स्थापत्यकलेच्या दृष्टीनेही अभ्यास होणे आवश्यक आहे.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी श्री खोलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासून मंदिरात दाखल होतात. महादेवाला जलाभिषेक करून बेलपत्र अर्पण केले जाते. सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या आरतीच्या वेळी भाविकांची मोठी उपस्थिती असते. श्रावण सोमवार, महाशिवरात्री आणि इतर धार्मिक पर्वांच्या काळात मंदिर परिसरात विशेष धार्मिक वातावरण निर्माण होते. भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजून जातो आणि शिवनामाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण मंगलमय होते.
श्रावणातील तिसरा सोमवार हा श्री खोलेश्वर महादेव मंदिरासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी श्री खोलेश्वर महादेवाच्या रथाची मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. लाकडापासून तयार केलेला हा सुबक रथ त्यावरील नक्षीकाम आणि कलाकुसरीमुळे लक्षवेधी ठरतो. करमाळ्यातील कमलादेवी मंदिरातील रथाशी या रथाच्या रचनेचे साम्य असल्याचेही सांगितले जाते. श्री खोलेश्वर आरती मंडळाच्या माध्यमातून रथाची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषामुळे किल्ला विभागासह संपूर्ण परिसर शिवमय होतो.
श्री खोलेश्वर महादेव मंदिराशी लिंगायत कोष्टी समाजाचीही धार्मिक परंपरा जोडलेली आहे. श्रावण महिन्यात समाजाच्या वतीने मंदिरात अनेक वर्षांपासून शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहात शिवनामस्मरण, भजन, कीर्तन, आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सप्ताहाच्या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे मंदिर परिसरात सातत्याने भक्तिमय वातावरण निर्माण होते आणि धार्मिक परंपरांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम या उपक्रमातून होत आहे.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन श्री खोलेश्वर आरती मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून मंदिरातील दैनंदिन आरती तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये युवक सक्रियपणे सहभागी होत आहेत. बदलत्या काळात तरुणाई आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी युवकांनी घेतलेला पुढाकार निश्चितच उल्लेखनीय आहे. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी या माध्यमातून या युवकांनी मंदिराच्या धार्मिक वातावरणात आपले योगदान दिले आहे.
श्री खोलेश्वर महादेव मंदिराची धार्मिक परंपरा जपण्यात मंदिराचे पुजारी श्री. नागेश काळे, त्यांचे सुपुत्र कुणार काळे यांच्यासह संपूर्ण काळे कुटुंबाचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. काळे कुटुंब मंदिरात मनोभावे पूजा-अर्चा आणि सेवा करीत असून, नित्यपूजा, आरती आणि विविध धार्मिक विधी श्रद्धेने पार पाडण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. मंदिरातील धार्मिक परंपरा अखंड सुरू ठेवण्यासाठी काळे कुटुंबाची सेवा महत्त्वाची ठरत आहे.
करमाळ्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात श्री खोलेश्वर महादेव मंदिराचे स्थान अनन्यसाधारण आहे. पुरातन वास्तू, दगडी बांधकाम, धार्मिक परंपरा, रथोत्सव, शिवनाम सप्ताह आणि नियमित आरती यामुळे मंदिराने करमाळ्याच्या सांस्कृतिक जीवनात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेषतः श्रावण महिन्यात या मंदिराचे धार्मिक वैभव अधिकच खुलून दिसते. पहाटेपासून दर्शनासाठी येणारे भाविक, मंदिरातील आरतीचा निनाद, बेलपत्र आणि जलाभिषेकाची परंपरा, शिवनामाचा जयघोष आणि रथोत्सवाचे भक्तिमय वातावरण यामुळे करमाळकरांच्या श्रद्धेचा हा ठेवा अनुभवण्यास मिळतो.
आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात प्राचीन धार्मिक वास्तू व परंपरा समाजाला आपल्या इतिहासाशी जोडून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. श्री खोलेश्वर महादेव मंदिर हे केवळ उपासनेचे ठिकाण नसून करमाळ्याच्या इतिहास, स्थापत्यकला, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळे या पुरातन वास्तूचे जतन व संवर्धन करणे, धार्मिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि मंदिराच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. श्रावणातील ‘हर हर महादेव’चा जयघोष या परंपरेची अखंडता आणि करमाळ्याच्या धार्मिक वैभवाची साक्ष देत आजही घुमत आहे.


