Uncategorized

समाजकल्याण विभाग अंतर्गत मागासवर्गीय-दिव्यांगांसाठी शासनाचा मदतीचा हात; विविध योजनांचा लाभ घेण्याचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी
समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षासाठी २० टक्के मागासवर्गीय कल्याण निधी आणि ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी पंचायत समिती करमाळा यांच्या वतीने व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन पंचायत समिती करमाळ्याचे गटविकास अधिकारी (वर्ग-१) डॉ. अमित कदम यांनी केले आहे.
मागासवर्गीय नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने २० टक्के मागासवर्गीय कल्याण निधीतून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये ४ शेळ्या व १ बोकडाचा शेळीगट, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी MS-CIT व TALLY प्रशिक्षण, मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी अनुदान, तसेच ५ एच.पी. मोटार आणि कडबाकुट्टी मशीन खरेदीसाठी अनुदान देण्याच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
दिव्यांग नागरिकांसाठीही ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीतून महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांगांना ४ शेळ्या व १ बोकडाचा शेळीगट, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी देण्याबरोबरच दिव्यांग स्वयंसहायता समूहांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी E-MOTION VEHICLE (स्कुटी) देण्याची योजना असून, ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांच्या पालकांना मदत अनुदान देण्यात येणार आहे. दिव्यांगांना अन्न व खाद्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठीही अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
या सर्व योजनांची माहिती करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी ग्रामपंचायत स्तरावरही मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू आणि पात्र व्यक्तींना मिळणे आवश्यक असून, त्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
समाजकल्याण विभागाच्या या योजनांमुळे मागासवर्गीय नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच दिव्यांगांना शिक्षण, व्यवसाय, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या संधीचा लाभ घ्यावा आणि आवश्यक प्रस्ताव व अर्ज पंचायत समिती करमाळा येथे सादर करावेत, असे डॉ. अमित कदम यांनी सांगितले.
योजनांबाबत पात्रता, अर्ज प्रक्रिया किंवा आवश्यक कागदपत्रांविषयी काही अडचण असल्यास पंचायत समिती करमाळा येथील समाजकल्याण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक श्री. गोरख एम. खंडागळे यांच्याशी ९६२३२५३०२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या या योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!