गणेशोत्सवानिमित्त राशीनपेठ तरुण मंडळाचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, प्रवचन, कीर्तन दिंडी सोहळा महाप्रसादाचे आयोजन
*
करमाळा प्रतिनिधी
करमाळ्याचा राजा राशीनपेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन आणि दिंडी सोहळ्यामुळे राशीनपेठ परिसरात संपूर्ण सप्ताहभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री गणेश मंदिर, राशीनपेठ येथे आयोजित या सप्ताहामध्ये दररोज सकाळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, तर रात्री प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. विविध भागांतून आलेल्या ह.भ.प. महाराजांनी संत साहित्य, वारकरी संप्रदाय आणि अध्यात्मिक विचारांवर मार्गदर्शन केले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
सप्ताहामध्ये ह.भ.प. नारायण चोबे (बार्शी), ह.भ.प. माधव गाठी महाराज (नाशिक), ह.भ.प. गोपाळ देशमुख (परळी), ह.भ.प. काका दिंडीवाले (पंढरपूर), ह.भ.प. आनंद जाधव (भालेवाडी) तसेच ह.भ.प. गुरुवर्य हृषिकेश वासकर महाराज (पंढरपूर) यांच्या प्रवचन व कीर्तनाचा भाविकांना लाभ मिळाला.
सोमवारी सकाळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायणाची सांगता करण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. भरत मोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. कीर्तनानंतर दिंडी सोहळा काढण्यात आला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला.
या सप्ताहामध्ये संतोष बनाते, मोहन पडवळे, भाऊसाहेब शेळके, संजय गायकवाड, आबा साने, हरी मोरे आदी गायकांनी सेवा दिली. मृदुंगाची साथ नंदू घाडगे व पोपट नलवडे यांनी केली. तर तरडगाव, आळजापूर, बाळेवाडी, बोरगाव, करमाळा, पोथरे, देवळाली, खांबेवाडी आदी गावांतील भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राशीनपेठ तरुण सेवा मंडळाने आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक परंपरा, अध्यात्म आणि वारकरी संस्कृतीचा जागर ठरला. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविकांनी परिश्रम घेतले.


