Friday, October 2, 2026
Latest:
Uncategorized

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी
वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेला पाळीचा मोगडा करमाळा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोधून काढला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे.
वीट येथील शेतकरी विजयकुमार महादेव गाडे (वय ६३) यांच्या गट क्रमांक ८१३ मधील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. २५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेला पाळीचा मोगडा चोरी करून नेला.
ट्रॅक्टर चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर गाडे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८५३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण विभागाने तपासाला वेग दिला.
पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीबरोबरच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान दिपक रामदास बरडे (वय ३२, रा. चिखलठाण नं. १, ता. करमाळा, जि. सोलापूर, मूळ रा. अमळनेर (भांडाचे), ता. पाटोदा, जि. बीड) आणि आकाश रामदास बरडे (वय २६, रा. अमळनेर (भांडाचे), ता. पाटोदा, जि. बीड) यांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर चोरीस गेलेला ट्रॅक्टर आणि पाळीचा मोगडा हस्तगत करण्यात आला.
हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (आरटीओ क्रमांक एमएच ४५ एफ ८०१९) आणि २५ हजार रुपये किमतीचा पाळीचा मोगडा यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरचा चेसिस क्रमांक DZYSW259723/3, तर इंजिन क्रमांक 310E1131260490F3 असा आहे. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
शेतीसाठी अत्यावश्यक असलेली वाहने चोरीला जाण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण होत असताना करमाळा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून चोरीचा मुद्देमाल शोधून काढल्याने शेतकरी गाडे यांना दिलासा मिळाला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक हणुमंत जाधव करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. आणि करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हणुमंत जाधव, पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल इसामिया बहिरे,रविराज गटकुळ, अमोल रंदिल, योगेश येवले, अर्जुन गोसावी, गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जाहिरान नाईकवाडी यांनी सहभाग घेतला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!