दहिगाव उपसा सिंचन योजनेचा दुसरा सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर

करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळ अंतर्गत करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कामकाज चालते. या योजनेसाठी प्रथम १९९५ -९६ मध्ये ५७.६६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. पुढे २००७ -०८ मध्ये या योजनेसाठी १७८.९६ कोटींची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ही आर्थिक तरतूद संपल्या कारणाने दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कामकाज थांबले होते.
दहिगाव उपसा सिंचन योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे गरजेचे होते. याकामी आ. संजयमामा शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष घालून दहिगाव योजनेचा दुसरा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने पूर्ण करा अश्या सूचना कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 यांना दिल्या होत्या .त्यानुसार दहिगाव योजनेचा 342 . 30 कोटींचा दुसरा सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव काल शासनाकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर दहिगाव योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील अपूर्ण चारी, पोटचारी तसेच पाणी सोडण्यासाठीचे गेट इत्यादी अपूर्ण कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मा .ना . अजितदादा पवार व मा .ना . जयंत पाटील साहेब यांची सकारात्मक भूमिका… आ.संजयमामा शिंदे .
दहिगाव उपसा सिंचन योजनेचा दुसरा प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी चा प्रस्ताव कालच जलसंपदा विभागाला सादर करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर वित्त व नियोजन विभागाकडून या योजनेसाठी आर्थिक तरतूद केली जाईल . दहिगाव योजनेच्या बाबतीत जलसंपदा मंत्री ना . जयंत पाटील साहेब व वित्त मंत्री ना .अजितदादा पवार यांनी सुप्रमा प्रस्ताव सादर करण्याच्या अगोदर पासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे लवकरच दहीगाव योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल व या योजनेसाठी भरघोस आर्थिक तरतूद केली जाईल असा विश्वास आ . संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला.
