३१ डिसेंबरपर्यंत कर्जवसुलीसाठी तगादा लावु नये मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांची मागणी.

करमाळा प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण भारतात लाॅकडाऊन जाहीर केल्या मुळे सर्व सामान्य नागरिक,शेतमजूर, हातावर पोट भरणारी जनता, मजूरांची उपासमार होत असल्याचे गेल्या सहामहिन्यांपासून दिसत आहे. आता कुठे तरी अनलाॅकमुळे हळूहळू परिस्थिती बदलत आहे.त्यातच आता शासनाच्या व सहकारी बँका, फायनान्स, पतसंस्था, सध्या असलेल्या महिला बचत गटांकडे वसुली करीत आहेत. ही वसुली. ३१ डिसेंबर पर्यंत करण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे ईमेल द्वारे केली आहे.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मागील काळात लाॅकडाऊन असल्यामुळे अनेक मजूरांचा रोजगार बुडाला आहे तर उद्योग धंदे ठप्प झाले अनेक खाजगी कामगाराला कामा वरून कमी करण्यात आले तर महीला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचे छोटे मोठे स्वयं रोजगार सुध्दा मोडकळीस आले आहेत, आता हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत असताना महिला बचत गटाला विविध बँका,फायनान्स,पतसंस्थाचे वसुली अधिकारी घरी जाऊन महिलांना धमकी देताना पहायला मिळत आहे.तसेच फायनान्स कंपनी खाजगी व्यक्ती कडून वसुली करून घेतात व त्यांना टक्केवारी नुसार पैसे दिले जातात. त्यामुळे जास्त टक्केवारी मिळविण्याच्या नादात ही मंडळी साम-दाम-दंड भेद वापरून कर्ज वसुली करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने कमीत कमी आता ३१ डिसेंबर पर्यंत कुठलीही कर्जदाराकडे वसुली करू नये वसुली साठी तगादा लावु नये, तसेच जबरदस्ती करून दंड व्याज लावू नये अन्यथा बँका, फायनान्स, पतसंस्थांच्या ऑफिसला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही.याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी लक्ष घालून या बाबतीत निर्णय घ्यावा असे या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार करमाळा पोलीस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आले.
यावेळी मनसे करमाळा शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, तालुका अध्यक्ष संजय घोलप, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क अध्यक्ष विजय रोकडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतिश फंड, जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे आदी उपस्थित होते.
