करमाळ्याची आई-जगदंबा* *कमलाई*
*आई गिरी नंदिनी नंदित* *मेदिनी*
*विश्वविनोदिनी नंदनुते*!
*जय जय हे महिषासुरमर्दिनी*
*रम्य कपर्दिनी शैलसुते*स्थापत्य कलेचा सुंदर नमुना म्हणजे करमाळ्याचे आई कमला भवानीचे मंदिर.अतिशय भव्य दिव्य असे हे मंदिर करमाळा शहराच्या पूर्वेस इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहे.
राजेरावरंभा निंबाळकर (इ.स.१७१७) यांनी हे मंदिर बांधले असून मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी व दक्षिणात्य बांधणीचे आहे.यावर मुस्लीम कलाकुसरीचा ही प्रभाव दिसून येतो.
कमला भवानीचे मंदिर हे शहराच्या पूर्वेस आहे.
हिंदू मुस्लिम ,विविध
धर्मांचे लोक आजही नित्यनेमाने सकाळी देवीच्या दर्शनासाठी जातात.देवीची पाठ शहराकडे असली तरी आशीर्वाद मात्र भरभरून मिळत आहेत.अशी धारणा व श्रध्दा आहे.
९६ कुलीन मराठा राजेरावरंभा निंबाळकर यांनी हे मंदिर बांधताना ९६ आकड्याची एक ओळख स्थापत्या मधून चिरकाळ स्मरणात रहावी.अशी कोरून ठेवली आहे.
हे मंदिर ९६ दगडी खांबावर उभे असून परिसरातील ओवर्या देखील ९६ आहेत.
मंदिराच्या आवारात उंच देखण्या दीपमाळा आहेत त्यांच्या पायर्या देखील ९६ आहेत.मंदिराच्या पूर्वेस ऐतिहासिक अशी ९६ पायर्या ची विहीर आहे.पूर्वी करमाळा तालुक्यात ९६ गावाचा समावेश होता.मंदिर परिसरात सूर्यमंदिर विष्णूमंदिर सारखे अनेक मंदिरे असून उत्तरेला एक बारव आहे.शांत रम्य अशा वातावरणात हे मंदिर आहे.
गोपुरांनी मंदिराच्या सौंदर्यात भर घातली आहे.
आई भवानीचे मंदिर हे टेकडीवर आहे.या परिसराला देवीचा माळ म्हणून ओळखले जाते.त्याच्याच पुढे खंडोबा चा माळ देखील आहे.
सर्व जाती धर्मासाठी खुले असणार्या आई कमलाईच्या मंदिर परिसरात विश्वस्त, ग्रामस्थ व शहरवासीय चोखपणे पावित्र्य जपतात.दोन्ही वेळेस आरती करून तेथील पुजारी देवीचा अप्रतिम असा साजशृंगार करतात.देवीच्या मळवटाचे नक्षीकाम तर पहाण्या सारखे असते. तसेच देवीचे अष्टक ही ऐकण्या सारखे असते.
भव्य अशा काळ्या पाषाणाची अष्टभुजा जगदंबे ची मुर्ती पाहिली की अहंकार मद मोह माया मत्सर आपोआपच गळून पडतात.आणि आपसूकच हात जोडले जातात.
आईच्या चरणी तरूणाई नतमस्तक होताना दिसते तेव्हा वाटते धार्मिक भावनांना अजून तरी तडा गेला नाही.
हिच तरुण पिढी भवानी ची ज्योत, मशाल घेऊन धावते तेव्हा ही वाटते की ही पीढी परंपरेने आलेल्या गोष्टी स्विकारते आहे.
देवीचा माळ येथील पूजार्यांची तरूणपिढी देवीचा नवरात्री उत्सव ,कार्तिकी यात्रा उत्सव
नव्या जोमाने पार पाडतात. तेही अगदी श्रध्देने व निष्ठेने.ही गोष्ट निश्चितच अभिनंदनीय आहे.
सैराट चित्रपटाने व अलका कुबल यांच्या दर्शन मालिकेने देखील करमाळ्याचे अध्यात्मिक अस्तीत्व दाखवून दिले आहे. तसेच गायक संदिप शिंदे पाटील यांनी स्वतः स्वरबद्ध केलेलेआई कमलाभवानीचे गीत ही आज लांब पर्यंत पोहचले आहे.
लेखाच्या शेवटी एवढेंच म्हणावे वाटते की.. देवीच्या गाभाऱ्यात जशी अखंड ज्योत तेवत आहे तसा आपल्या सर्वांच्या ही मनात जातीधर्म आणि स्त्री बद्दलचा आदर अखंड तेवत राहो.
*अंबेमबा त्रिपुर सुंदरी* *आदिमाय*
*दारिद्रय भव दु:ख भरुनी* *दावी पाय*
७ /१०/२१
©️®️साहित्यिका
अंजली श्रीवास्तव करमाळा.
