केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख भरपाई देण्याची ॲड सविता शिंदे यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेकटरी किमान एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ऍड. सविता शिंदे यांनी केली आहे.ॲड. सविता शिंदे पुढे म्हणाल्या की, करमाळा तालुक्यातील आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या दुरवस्थेमुळे ऊस उत्पादक शेतकरी केळीच्या पिकाकडे वळाला आहे. त्यामुळे तालुक्यातील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर केळीच्या लागवडीखाली आले आहे. त्यामुळे सुरुवातीला केली उत्पादकांना चांगला फायदाही झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली. यावर्षी केळीचे पीक ही भरघोस प्रमाणात आल्यामुळे करोना लोकडाऊनच्या काळातील नुकसान भरून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा निर्माण झाली होती. परंतु सध्या केळीची परराष्ट्रात होणारी निर्यात थांबली असल्यामुळे केळीला मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची केळी शेतातच पडून राहिल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकरी ही कांद्याचे भाव पडल्यामुळे मोठ्या अडचणीत असून त्यांचीही दखल सरकार दरबारी घेणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे आधीच संकटात असलेला शेतकरी संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. सरकारी पातळीवरून याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर, ज्येष्ठ नेते शरद पवार राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी आपण त्यांना पत्र लिहून केल्याची माहितीही ऍड. सविता शिंदे यांनी दिली.
