शेतकरी आणि सामान्य माणसांशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण-प्रा.नितीन तळपाडे
करमाळा प्रतिनिधी शेतकरी आणि सामान्य माणसांशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण असल्याचे मत प्रा.नितीन तळपाडे यांनी व्यक्त केले.करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रा.नितीन तळपाडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव श्री. विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, प्रबंधक कैलास देशमुख हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
प्रा.नितीन तळपाडे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक पैलूंचे अनेक उदाहरणे देऊन विवेचन केले आणि यशवंतराव चव्हाण हे इथला शेतकरी आणि सामान्य माणूस यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे नेते होते किंबहुना या दोन समाजघटकांशीच त्यांची नाळ जोडली होती असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.लक्ष्मण पाटील यांनी यशवंतराव चव्हाण हे सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले असामान्य नेते होते या शद्बात अनेक दाखले देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले तर उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले.
