आदिनाथ बचाव मोहीम: विवेक येवले यांनी उपस्थित केले काही प्रश्न..!
आदिनाथ बचाव मोहीम:
विवैक येवले यांनी उपस्थित केले काही प्रश्न मा.एच.बी.डांगेसो
या मुलाखतीतून तुम्ही मांडलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन! या मुलाखतीमध्ये तुम्ही मांडलेल्या मुद्यांबाबत काही शंका व प्रश्न तुमच्यासमोर मांडत आहे.त्याचे निराकरण आदिनाथ बचाव समितीच्या वतीने दि.25 मार्च रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करावे ही अपेक्षा व विनंती!
1) तुमच्या या मुलाखतीत आम्ही सामान्य व बिगर राजकीय मंडळी अशा अर्थाचा काहीतरी उल्लेख आलेला आहे.पण तुमच्यासोबत दिसत असलेल्या शहाजीराव देशमुख सर,केरू गव्हाणे,डाॅ.वसंतराव पुंडे यांना अराजकीय कसं म्हणता येईल? देशमुख व गव्हाणे यांनी संचालक व व्हाईस चेअरमन व पुंडे यांनी संचालक म्हणून प्रदीर्घ काळ काम केलेले आहे आणि यांना संधी मिळाली ते राजकारणात कोणाचे तरी नेतृत्व पत्करले म्हणूनच ना! तुम्ही तर आदिनाथचे पहिले कार्यकारी संचालक म्हणून काम केलेले आहे शिवाय सहकारी साखर कारखानदारीमध्ये अभ्यासू,जाणकार व प्रदीर्घ अनुभव असलेले व आता निर्मोही व्यक्तिमत्त्व म्हणून तुम्हाला ओळखले जाते.त्यामुळे एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेला आदिनाथ हा अक्षरशः दिवाळखोरीत निघालेला आहे आणि ज्या-ज्या मंडळींनी येथे वेळोवेळी सत्ता भोगली आणि ज्यांच्यामुळेच कारखान्याचे वाट्टोळे झालेले सर्वज्ञात असताना त्याच मंडळींची मोट बांधून कारखाना बचाव मोहीम राबविणे सामान्य सभासद व ऊसउत्पादक शेतकऱ्यांना पटेल का? याचा साधकबाधक विचार व्हावा.
2) पवारसाहेबांमुळे या तालुक्याची जडणघडण झाली असे म्हणणे देखील संयुक्तिक वाटत नाही.स्वातंत्र्योत्तर काळात या तालुक्याची राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,सहकार आदी जडणघडण झाली ती कै.नामदेवरावजींच्या नेतृत्वाखाली.त्यांच्या आग्रहामुळे 1966 साली यशवंतरावजींच्या हस्ते वरदायिनी उजनी धरणाची पायाभरणी झाली त्या वेळी पवार हे साधे आमदार देखील नव्हते.(प्रथम आमदारकी-1967) आणि आदिनाथची मुहूर्तमेढ सहकारमहर्षींनी रोवली ती 1971.ते आदिनाथचे प्रवर्तक,संस्थापक-चेअरमन होते.पवार हे ऐंशीच्या दशकात राज्याचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.असो…
3) तुमच्या योजनेनुसार ठेवीदारांनी आपापल्या नावावर एफ.डी.करून आदिनाथ साठी उभारण्यात यावयाच्या कर्जासाठी आपले एन.ओ.सी.म्हणजे आपली ठेव रक्कम तारण म्हणून द्यायची.बरोबर ना? आणि असे असेल तर पुढची शंका अशी की,या नियोजनानुसार कर्जउभारणी जर झालीच आणि येत्या हंगामात कारखाना सुरू झालाच आणि तुमच्या अपेक्षेनुसार पुनर्वैभव मिळवू शकला तर तालुक्याच्या व ऊसउत्पादक,सभासदांच्या दृष्टीने ते सोनियाचे दिवस ठरतील हे नक्की! पण…दुर्दैवाने काही विपरित घडले तर मग गहाण ठेवलेल्या या ठेवींचे काय? असे जर घडलेच तर आधीच जेरीस आलेल्या या उसउत्पादक शेतकर्यांची अवस्था ” आगीतून उठून फुफाट्यात! ” अशीच व्हायची.आणि असे होवू नये यासाठी तुमच्याकडे काय नियोजन अथवा हमी आहे?
4) आदिनाथची सभासदसंख्या ही जवळपास 35 हजार इतकी असताना अवघ्या अडीचशे-पावणेतिनशे सभासदांनी ऑनलाईन मिटिंगमध्ये दिलेला पाठिंबा हा खरेच लोकशाहीला व लोकनिर्णयाला अनुसरून समर्थनीय आहे काय…याचेही योग्य मूल्यमापन होणे गरजेचे आहे.
5) 23 नोव्हेंबर 1993 रोजी आदिनाथ चा प्रथम चाचणी हंगाम सुरू झाला.तेव्हापासून गेल्या अठ्ठावीस वर्षांत बागल,जगताप,नारायण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कमीअधिक प्रमाणात सत्ता उपभोगलेली आहे.कै.गिरधरदास देवी,कै.रावसाहेब पाटील,कै.गोविंदबापू, डाॅक्टर आबा,वामनराव बदे,जयवंतराव,मस्करतात्या,संतोष पाटील,बागल मामी आदी मंडळींनी चेअरमन म्हणून काम केलेले आहे.आदिनाथवर आजअखेर सर्वाधिक काळ वर्चस्व व सत्ता ही कै.डिगामामा व बागल गटाचे राहिलेले आहे.या पैकी सध्या हयात असलेल्यांनी व हयात नसलेल्यांच्या वारसदारांनी आदिनाथावर हात ठेवून ग्वाही द्यावी की आम्ही आदिनाथ च्या एका रूपयाला देखील हात लावलेला नाही.आणि त्यानंतर अशी ग्वाही देणाऱ्या पुण्यशील नेते व त्यांच्या बगलबच्च्यांना बरोबर घेऊन आदिनाथ बचाव ची मोहीम सर्वानुमते राबवावी.
6) उसउत्पादक सभासद या व्यतिरिक्त आमदार संजयमामांचा आदिनाथ च्या प्रगती व अधोगतीशी कसलाही काडीमात्र संबंध आजअखेर आलेला नाही.त्यामुळे आमदार या नात्याने त्यांचेकडून काही अपेक्षा करणे हे जरी अनुचित नसले तरी बचाव मोहिम लढताना या समितीला अलिबाबा और चालीस चोर! असा चेहरा नसावा ही आदिनाथ च्या खऱ्या हितचिंतक असलेल्या उसउत्पादक शेतकर्यांची माफक व रास्त अपेक्षा आहे!
