करमाळा तालुक्यात भाद्रपदी पोळ्यावर लंम्पी स्किनचे सावट
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्याचे पश्चिम भागात तसेच उजनी लाभक्षेत्रात भाद्रपदी बैलपोळा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला जातो परंतु, यावर्षी जनावरावर लंम्पी स्कीनच्या या रोगाच्या प्रादुर्भावाखालीच पशुपालकांनी साध्या पद्धतीने घरच्या घरी साजरा करावा असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण शिंदे यांनी केले आहे.
करमाळा तालुक्याचे पश्चिम भागात भाद्रपदी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व सण बंद होते परंतु कोरोना संपल्यानंतर आता सर्व सण निर्बंध मुक्त साजरे करण्यात येत आहेत. गणेशोत्सव, दहीहंडी तसेच श्रावणी बैलपोळा ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंतु,भाद्रपदी बैलपोळ्याच्या तोंडावरच राज्याच्या काही जिल्ह्यात बैलामध्ये लंपी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. करमाळा तालुक्यात लंम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे अद्यापतरी आढळून आले नाही. तरीही लसीकरण वेगात सुरू आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पशुपालकांनी बैलपोळा घरच्या घरी साजरा करावा गावात जनावरे एकत्र आणू नयेत असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.पशुपालकांनी रोग प्रादुर्भावा बाबत काळजी घ्यावी असेही आवाहन केले आहे.
