कृषि विभाग (आत्मा) सोलापूर, कृषि विज्ञान केंद्र बारामती ग्रामपंचायत मांजरगाव च्या वतीने दुग्ध व्यवसायीकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
केत्तूर (अभय माने ) महाराष्ट्र शासन – कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूर, कृषि विज्ञान केंद्र बारामती व ग्रामपंचायत मांजरगाव (ता. करमाळा ) यांचे सयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील पशुपालक शेतकरी यांचेसाठी कौशल्य आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत *ओल्या चाऱ्यापासून मुरघास निर्मिती* या विषयावरील एक दिवसीय प्रत्यक्ष मुरघास निर्मिती कार्यशाळा/ प्रात्यक्षिक बुधवार (ता. 28/9/22 ) रोजी सकाळी ठिक 10 वाजता मौजे मांजरगाव येथे आयोजीत करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेसाठी कृषि विज्ञान केंद्र बारामती येथील तज्ञ शास्त्रज्ञ डॉ. रतन जाधव उपस्थित पशुपालक शेतकरी तसेच शेतमजूर यांना मुरघास तयार करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत तसेच प्रत्यक्ष मुरघास तयार करणे तसेच दुग्ध व्यवसाया मधुन जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल , मुरघासाचे दुग्ध व्यवसायातील महत्व या विषयी मार्गदर्शन करणार असुन मुरघास तयार करणे व त्याची साठवणूक याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविले जाणार आहे. याबरोबरच कोर्टी येथील प्रगतीशील शेतकरी दुध उत्पादक तसेच दरवर्षी 100 टन मुरघास स्वतः तयार करणारे प्रगतीशील शेतकरी / पशुपालक श्री. श्रीमंत झाकणे हे सुद्धा उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन तसेच मुरघासाचे प्रात्यक्षिक करून दाखविणार आहेत. तरी मांजरगाव व परीसरातील शेतकरी बंधूंनी सदर कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन कृषि विभाग व मांजरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.
या विषयी माहीती देताना सरपंच सौ.गायत्री कुलकर्णी म्हणाल्या कि
जे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात पूर्णपणे सहभागी होऊन प्रशिक्षित होणार आहेत त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेबाबत कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र बारामती यांचे वतीने सर्टिफिकेट दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच या प्रमाण पत्राचा उपयोग भविष्यामध्ये कर्जप्रकरण तसेच शासकीय योजनांसाठी होऊ शकतो म्हणुन पचक्रोशीतील सर्व पशुपालक शेतकरी यांनी हे प्रशिक्षण पूर्ण करून यशस्वी पशुपालक बनुन आपली अर्थिक प्रगती साधावी असे आवाहन केले आहे.
