करमाळा तालुक्यातील सभासदांना साखर कडूच – सुजीत बागल
करमाळा प्रतिनिधी
कर्ज काढून हजारो रुपये जमा करून आदिनाथ व मकाईचे सभासदत्व घेऊन ऊस जाणे, भाव मिळणे तर दूरच दिवाळी साठी २० ते २५ किलो अल्प दरात साधी साखर देखील करमाळा तालुक्यातील सभासदांच्या नशिबी नाही हे दुदैव सत्ताधार्यांच्या अंधादुंध कामकाजा पेक्षा सभासदांच्या गुलाम मानसिकतेचे दर्शन घडविते असेच म्हणावे लागेल असे मत मांगी सोसायटीचे चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य सुजीत बागल यांनी व्यक्त केले .
पुढे बोलताना बागल म्हणाले की, याला कारणही तसेच आहे, आपल्या कार्यकक्षे बाहेरील मागण्या करून वृत्तपत्रात बातम्या झळकविणारे स्वयंघोषित पुढारी व सोशिक सभासद दिवाळी साठी साधी साखरेची मागणी देखील करण्याचे धाडस दाखवत नाही ही कसली लाचारी? ( पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्याने कारखाना बंद असल्याने दिवाळीसाठी दूसरीकडून साखर विकत आणून सभासदांना साखर व जुने बीले दिली ) सभासदांच्या मानसिकतेमुळेच आपण या कारखान्यांची दुर्दशा पाहत आहोत . याउलट जनरल मिटींग मधील ठरावानुसार आपण वाढीव शेअर्स ची रक्कम पुन्हा जमा करणार व सत्ताधार्यांच्या प्रपंचाची व्यवस्था करणार, आम्हाला इतर कारखान्यां प्रमाणे २५०० – २६०० रुपये भाव तर नकोच फक्त ऊस गेला तरी समाधान ,भाव १५०० – २००० पेक्षा जास्त मिळाला तरी आम्ही नाकारतो, कारण आम्हाला सभासदांच्या मालकीचा कारखाना – शेतकर्यांचा राजवाडा हा याच सत्ताधार्यांच्या अडचणीतले प्रपंच सुदृढ करण्यासाठी त्यांच्याच ताब्यात ठेवायचा आहे .धन्य ते सभासद व सत्ताधारी असा घणाघात बागल यांनी यावेळी बोलताना केला
.थोड बारामती, पंढरपूर, माढा इथले कारखाने, भाव, सुविधा यांचा अभ्यास करा अन्यथा आपलाही भोगावती झालेलाच आहे . येणार्या निवडणुकीत पुन्हा याच लोकांना निवडून द्या म्हणजे झाल, नाहीतरी लाचारी आपल्या नसानसात आहेच . दिवाळी निमित्त सभासदांनीच सत्ताधारी संचालकांना अल्पदरात नव्हे तर मोफत साखर देणेची आता वेळ आली आहे, तुमची नाही निदान त्यांची तरी दिवाळी गोड करा, शुभ दिपावली असे परखड वक्तव्य देखील सुजीत बागल यांनी केले .
