Thursday, April 17, 2025
Latest:
Uncategorized

** एका पैठणीचा प्रवास *** 🌹………….. ( पैठण ते येवला )…………….🌹

आजच्या युगामध्ये फारच आधुनिकता हे जरी मान्य असलं तरी आणखी काही गोष्टी आपल्याला मानाव्या लागतात, मिळवाव्या लागतात या नवीन जनरेशन मध्ये ज्या प्रकारे स्लीपर पासून स्पोर्ट शूज पर्यंत सर्व पादत्राणे बाजारात या धकाधकीच्या स्पर्धेमध्ये विकली जात असताना कोल्हापुरी चप्पल ही बाराव्या शतकापासून स्वतंत्र अस्तित्व,स्वतःचं वेगळेपण टिकवून आहे त्याचप्रमाणे आज सर्व प्रकारच्या साड्या विकल्या जातात पण पैठणीची साड्यांची महाराणी ही ओळख टिकून आहे आपल्या महाराष्ट्राने सांस्कृतिक वारसा असलेली पैठणी पुढे नेत त्याला एक व्यावसायिक स्वरूप दिलं आहे तसं बघायला गेलं तर कपाट ढीगभर साड्यांनी भरलेलं का असंना त्यात एक दोन तरी पैठण्या हव्यात याकडे स्त्री वर्गाचं लक्ष जास्त
आणि तमाम स्त्री वर्गाचं एकंदर वैशिष्ट्य पाहता कोणताही सण समारंभ अथवा विशिष्ट घटकाचा सांस्कृतिक कार्यक्रम असो महिला आवर्जून पैठणी नेसून त्यावर पारंपारिक दागिने घालून वावरणार पण एक लक्ष देण्यासारखी विशेष बाब म्हणजे प्रत्येक पैठणी अथवा भर जरी नेसलेली भगिनी वावरताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कटाक्षाने आपल्या साडीची मोहकता त्या किती जणी डोळ्यात टिपतात याचा एक अंदाज मनस्वी गणित त्यांच्याकडे असतं ह्या खास वातावरणामुळे त्या एक प्रकारे वेगळ्या शैलीतून मनामध्ये खुश असतात कारण शेवटी ती भरजरी अथवा पैठणीच आहे शेकडो कौतुकाच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण पैठणी हे आपल्या साड्यांच्या संस्कृतीमधील राजेशाही महावस्त्र मानलं जातं कारण पैठणी म्हणजे महाराष्ट्रातील भरजरी पारंपारिक वस्त्र प्रकार गडद रेशमी संपूर्ण जरीचा पदर आणि रुंद व ठसठशीत वेलबुट्टीचे काठ पैठणीची ही प्रत्यक्ष ओळख तर संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखी वेलबुट्टी दिसते हे तिचे खास वैशिष्ट्य
नऊवारी ही मराठी स्त्री ची ओळख तर पैठणी तिचे महावस्त्र मराठा काळामध्ये पैठणची पैठणी लोकप्रिय होती पैठणीच्या रंगसंगती आणि पायाजवळच्या काठावर व पदरावर केले जाणारे जरीकाम तिला मौलिक ठेव्याचे वजन प्राप्त करून देत असे आणि एका दृष्टीने खरं बघायला गेलं तर पैठण हे कलेचे केंद्र म्हणून गेली 2000 वर्ष ओळखले जाते हे नाव या साडीला पैठण गावावरून मिळाले पैठण हे पैठणी,पितांबर,धोतर,उपरणे,शेले यासाठी प्रख्यात होतं सातवाहन राजाचा पैठणी विणण्याच्या कलेला आश्रय होता साडी निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची स्वतंत्र बाजारपेठ पैठणला निर्माण झाली होती सध्याच्या काळात तेथे पैठणीचे साहित्य मिळत नाही बाजारपेठांची त्याकाळची नावे मात्र अजूनही कायम आहेत उदाहरणार्थ पावटा गल्ली म्हणजे चांदीच्या तारांला दावा देणारे साहित्य, जर गल्ली,तार गल्ली ही गल्ल्यांची नावे आजही प्रचलित आहेत सतराव्या शतकात रघोजी नाईक या सरदाराने रामदास वालजी नावाच्या एका गुजराथ्याला हाती धरून पैठण वरून येवलेवाडीत म्हणजे नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पैठणी विणणारे काही कसबी कारागीर आणून तेथे पेठ वसवली आणि त्यांच्याकडून पैठणीचे उत्पादन सुरू केले त्यांना कच्चामाल मिळावा व विणलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून मुद्दाम गुजरातहून व्यापारी आणण्यात आले व त्यांच्या पेढ्या येथे उघडण्यात आल्या तेथील पैठण्याना सरदार व धनीक यांचा ग्राहक वर्ग लाभला नाशिकच्या येवला,नागडे,वडगाव,वल्लेगाव,सुकी या गावांमध्ये अनेक कारागीर पैठणी बनवण्याचा व्यवसाय करीत आहे
त्या परिसरातील कारागीर हे क्षत्रिय खत्री, साळी , गोष्टी, मराठा,नागपुरी समाजातील आहेत त्यातील खत्री समाजातील कारागीर स्वतःच्या नावापुढे सा लावतात पैठणी कारागीरांचे प्रामुख्याने तीन प्रकार पहिला कोणतेही भांडवल उपलब्ध नसलेले उधारीवर कच्चामाला आणून पैठणी तयार करून देणारे,दुसरे कच्चामाल खरेदी करून पैठणी तयार करून देणारे,आणि तिसरा म्हणजे कच्चामाल देऊन पैठणी तयार करून घेणारे व्यापारी बहुतांश कुटुंबे हा वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात अशा कुटुंबामध्ये भाऊ मागावर बसतात तर घरातील स्त्रिया डिझाईन बनवण्यासाठी हातभार लावतात पैठणीच्या निर्मितीमध्ये अनेक कारागिरांचा हातभार लागतो हिरवा, पिवळा,लाल,कुसुंबी हे पैठणीचे खास कलर ते करडीच्या मुळापासून तयार केले जात त्यांना सुवास ही असायचा
रंगारी हा रेशमावर पक्या रंगाचा हात फिरवायचा सोनार सोन्याची आणि रुप्याची पत्रे ठोकून द्यायचा ते पत्रे एकजीव करायचं काम चपडे करायचे चपडे हे काम ज्या मठाऱ्याच्या म्हणजे हातोड्याच्या साह्याने करायचे त्या मठारावर आणि ऐरणीवर पाण्याची एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केल्यामुळे त्या पत्र्यांना एक प्रकारची झळाळी मिळायची त्यानंतर लगदेकरी त्या पत्र्याच्या तारा सफाईने ओढायचे नंतर त्या बारीक तारा तारकशी काढत त्यानंतर वाटवे त्या सुबकतारा चाकावर गुंडाळून कारागिराच्या हवाली करायचे असे उंची रेशमी धागेही विविध प्रक्रिया करून तयार करण्यात येत असे उदाहरणार्थ रहाटवाल्यांनी रेशीम धाग्याची निवड करणे कातकऱ्याने त्या आसारीवर चढवणे आसारीवरील रेशीम चाचपून त्यातून चांगले रेशमी धागे निवडणे तात नावाच्या यंत्रावरून निवडलेल्या धाग्याच्या देवनळाच्या साह्याने लहान लहान गरोळ्या बनवणे त्यानंतर त्यावरून ते रेशीम धागे ढोलावर घेणे व ढोलावरून फाळक्यावर नेणे इत्यादी विविध प्रक्रिया करण्यात येत कातलेल्या रेशीम धाग्याला सीरिया म्हणायचे नंतर रहाटवाला रेशीम रंगाऱ्याकडे द्यायचा अखेर मागवाला त्याला खळ वगैरे देऊन ते मागावर चढवायचा व त्यापासून ताणा व बाणा याच्या साह्याने पैठणी विणून पूर्ण करायचे
विणकर रेशीम पोताच्या खाली हव्या असलेल्या नक्षीकामाचे आकृतीबंध असलेले कागद ठेवून व त्यानुसार विणकाम करायचा त्यात विणकाराला बरेच कसब दाखवावे लागायचे अत्यंत काटेकोर पणा राखावा लागायचा पैठणी तयार करण्यासाठी 21 दिवस लागतात त्यापैकी केवळ पदराच्या विणकामासाठी सात दिवस खर्ची पडतात नव्या युगात यंत्रसामुग्री जरी आली असली तरी पदराचे काम हातानेच केले जाते त्यामध्ये सोन्याचा धागा ओवायचा मग जरीला रंगीत धाग्यांनी नक्षी काढायची हे काम कुशल कारागीरच करतात जुनी पैठणी 16 हात लांब व चार हात रुंद असायची तिच्या काठापदरावर वेलबुट्टी किंवा पशु पक्षांच्या प्रतिमा असायच्या व तिचे वजन साडेतीन शेरापर्यंत असायचे म्हणजे सुमारे 3 किलो 300 ग्रॅम वजन एका पैठणीसाठी 22 तोळे चांदी बरोबर सहा,आठ, बारा क्वचित अठरा मासे म्हणजे सुमारे 17.4 ग्रॅम सोने वापरण्यात येई
बारा मासी,चौदा मासी एकवीस मासी यासारख्या नावाने पैठणीचा प्रकार,दर्जा व किंमत ठरवण्यात येई 130 नंबरचे रेशीम वापरलेल्या छत्तीस मासी पैठण्या राजघराण्यात गेल्याची नोंद जुन्या कागदपत्रात आढळते फुल,पाने आणि नदी यांच्या नक्षीकामाच्या पैठणीला असवली, रुईच्या नक्षीला रुईफुल,चौकोनी फुलाच्या नक्षीला अक्रोटी तर राजहंसाचा पदर असलेली पैठणी म्हणजे राजेशाही मानली जाते इतकेच नव्हे तर पैठणीच्या रंगावरून तिला नावे दिलेली आहेत पिवळ्या रंगाच्या पैठणीला सोनकळी,काळ्या रंगाच्या पैठणीला चंद्रकळा,गुलाबी रंगाच्याला पैठणीला राणी तर कांद्याच्या रंगाला अबोली असं म्हटलं जातं या रंगा खेरीज अंजिरी, सोन कुसुंबी व दुधी रंगाचाही वापर करण्यात येई
पैठणी मध्ये आधुनिक काळात सेमी पैठणी, सिंगल पदर,डबल पदर,टिशू पदर व रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात याशिवाय काठपदराच्या विशिष्ट नक्षीकामानुसार मुनिया ब्रॉकेट,ब्रॉकेट असे वर्गीकरण केले जाते पैठणीची सर्वसाधारण किंमत अडीच हजार रुपयांपासून तीन लाखापर्यंत असते तर अशा वैविध्यपूर्ण गुणांनी नटलेल्या पैठणीने तमाम स्त्री वर्गाला मोहात पाडलेलं असल्यामुळे कशी का होईना पण कपाट भरून जरी साड्या असल्या तरी एखादी तरी पैठणी संग्रही असावी असा अट्टाहास प्रत्येक गृहिणीचा असतो आणि विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा कपाट आवरायला घेईल तेव्हा बाकीच्या साड्या नुसत्या व्यवस्थित हँगर ला अटकावल्या जातात पण पैठणीला एका लहान बाळासारखं नाजूकरीत्या अलगदपणे दोन्ही हातात घेऊन त्या घडीवर मायेचा, प्रेमाचा आणि कौतुकाचा हात फिरवल्याशिवाय चैन पडत नाही
………………………………………………………….
प्रस्तुती – किरण बेंद्रे
पुणे
7218439002

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group