……शक्तीपीठ ……
……शक्तीपीठ ……
जसा शरीराचा शृंगार देहाला सुंदर बनवतो तसेच प्रगल्भता, अनुभव आणि विवेक विचारांना सुंदर बनवतात. शरीराचा शृंगार काही क्षण मोहून टाकतो… पण अनुभवाने आणि ज्ञानाने शृंगारिक झालेली माणसं पिढ्यानपिढ्यांना भारावून टाकतात…
असाच एक अवलिया.. न्यूरोसर्जन डॉ. सचिन गांधी ( शिवाजीनगर,पुणे)
खरंतर ,डॉक्टर आणि रुग्ण एक नातंच वेगळं… बंध नसूनही बांधलेलं… प्रेम, आदर आणि काळजी, तळमळीने सांधलेलं..
कालच्या घटस्थापनेचा दिवस… मनामधे अनामिक भिती आणि काहूर घेऊन आलेला… त्याला कारणही तसंच होतं … मला मेंदूशी संबंधित एक मोठी शस्त्रक्रिया तात्काळ करून घेणे गरजेचे होते , त्याला पर्यायही नव्हता आणि वेळही नव्हता… त्यामुळे जहाँगिर हॉस्पिटल पुणे येथे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. सचिन गांधी यांच्या द्वारा ही शस्त्रक्रिया केली जाणार होती, सोबत प्रसिद्ध ENT Specialist डॉ. सरदेसाई ही असणारच होते… माझे सर्व कुटूंब अगदीच भयभीत अवस्थेत… आणि अशा अवस्थेतच आम्ही डॉ. सचिन गांधी सरांना भेटलो…
खरंच, काळ्या कुट्ट अंधारात जेव्हां काहीच दिसत नसतं .. तेव्हां दिवा घेऊन तुमच्या साठी कुणीतरी उभं असतं… तेव्हांच वाट उजळते याचा प्रत्यय मला त्यावेळी आला.
माझ्या साऱ्या तक्रारी, सारं नैराश्य आणि त्या नैराश्यातले काळसर तवंग मनातून पुसून काढून उमेदीचं बीज घटात घालून डॉक्टरांनी मला सृजनाची आराधना करण्यास या घटस्थापनेच्या दिवशीच शिकवले म्हणूनच ते माझं शक्तीपीठ !
दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि शरीरात ऊर्जेचा एक जीवंत प्रवाह स्पर्शून गेला मनाला.. मनाला एक सुवर्णझळाळी मिळाल्यासारखे वाटले क्षणभर ! आशेचा अखंड दिप पुन्हा एकदा उजळवून माझी उमेद वाढीस लावून धैर्याचं सीमोल्लंघन करायला शिकवून अखेर माझ्या आयुष्याला यशाचं तोरण बांधलं डॉ. सचिन सरांनी… एका सर्वसामान्य स्त्रीला जीवदान देऊन खरी घटस्थापना तर त्यांनीच केली कारण एका सर्वसामान्य स्त्रीला दुर्गामातेच्या रुपात पाहिले त्यांनी … हीच तर खरी घटस्थापना ! …
एका खचलेल्या मनाला हळुवारपणे, भाऊरायाच्या ममतेने डॉक्टरांनी तर दिली सक्षमता!… यशाच्या ‘हिमालयावर झेंडा रोवण्याची !… त्यामुळे तर मी एवढया मोठ्या शस्त्रक्रियेला न डगमगता तोंड देऊ शकले सक्षमपणे….
आज मी बऱ्यापैकी त्या व्याधीतून बाहेर पडलेय. त्यामुळे व्यक्त व्हावंसं वाटलं … मनातच राहिले तर पापुद्रे चढतील त्यावर मौनाचे, विचारांचे .. म्हणूनच बुद्धीची लेखणी आणि मनाचा कागद करून मी हे लिहितेय … दुःखालाही चिमटीमधे धरता येतं आणि त्याचं फुलपाखरू करता येतं . आयुष्याचं सौंदर्य हसून अनुभवायचं … मग सगळ्या अडचणी आणि नकार, दुःख गळून पडतात हे मी शस्त्रक्रिया झाल्यावर त्या जहाँगिर हॉस्पिटलमधे प्रत्यक्ष अनुभवलं… शिकले.
“कणाकणाने ज्योत जळाली उजळीत तेजो धन
जगा द्यावया शीतलपणा झिजले हे चंदन ”
खरंच,वडाचे सावली देणारे प्रचंड झाड दोन दिवसात वाढत नाही मात्र एकदा का ते उभे राहिले म्हणजे हजारोंना छाया देते, त्याचे शीर गगनाला भिडते, त्याची मुळे पाताळगंगेची भेट घेतात पण असे हे महान वैभव – वडाला प्राप्त व्हावयास त्याला दगडधोंड्यात मुळ्या रोवीत रोवीत कित्येक वर्ष उन्हापावसाचा मारा झेलावा लागतो, आणि असे वटवृक्षरूपी डॉक्टर मला लाभले याचा मला मनस्वी आनंद वाटतो.
एकंदरीत शुभाला आणखी शुभंकर असे उत्साहाचे रूप देणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. सचिन गांधी !
आज माझी पावले नव्या ऊर्जेने पुन्हा एकदा आपल्या रोजच्या रणांगणाकडे वळून आता सज्ज झाली आहेत कारण माझ्या मागे न्यूरोसर्जन डॉ. सचिन गांधी सरांचे आधार आणि विश्वासाचे ते शब्द ढाल बनून उभे आहेत.
डॉक्टर आणि पेशंटचे असे नाते सदैव सदाफुली सारखे बहरत राहो… हे ऋणानुबंध आजन्म मनात राहोत … आणि डॉ. सचिन गांधी यांच्या प्रतिभेचा गाभारा आणखी उजळत राहो आणि तो अखंड उजळत राहणार याची मला खात्री आहे….
सौ. शगुफ्ता शेख (हुंडेकरी)
करमाळा जि. सोलापूर