Monday, April 21, 2025
Latest:
Uncategorized

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय,छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे -चंद्रकांत पाटील

 

पुणे , १ जानेवारी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शौर्य दिनाच्या निमीत्ताने,युद्धात प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास अत्यंत विनम्र अभिवादन केले आहे.  सर्वांनी शांततेने शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना द्यावी दर्शन घ्यावे.कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना अत्यंत नम्र आवाहन केले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले आहे कि, शौर्य दिनाच्या निमीत्ताने मानवंदना देण्यास अभिवादन करण्यास भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना देता यावी व येणाऱ्यांना अतिशय श्रद्धेने विजयस्तंभास मानवंदना देता यावी दर्शन घेता यावे यासाठी सरकारने सर्व सुविधा उभारल्या आहेत. त्या क्षेत्राच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही देण्याचे शासनाने निश्चित केले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. 

बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक ०१ जानेवारी १९२७ रोजी आपल्या अनुयायांसह, भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना दिली
होती. तेव्हापासून हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगावला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल माझ्या मनात प्रचंड श्रद्धा आहे तिचे जाहीर प्रदर्शन करणे हा माझा स्वभाव नाही, असे पाटील यांनी म्हटले. 

सन १९८२ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रत्नागिरीचे पतीतपावन मंदिर ते दादरच्या चैत्यभूमी पर्यंत एक महिनाभर चाललेल्या समता यात्रेचे नेतृत्व चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठी शेकडो गावांमध्ये केलेल्या संवाद यात्रेचे नेतृत्वही पाटील यांनी  केलं आहे.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घराघरात साजरी व्हावी व नव्या पीढी पर्यंत त्यांचे विचार पोहोचावेत म्हणून प्रत्यक्ष प्रयत्न केले, आजही, एक नाही दोन नाही कोल्हापुरातील वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये चंद्रकांत पाटील हे लहान मुलांच्या बुद्धीचा विकास करणारी ‘खेळघरे’ सुरू केली आहेत, व वंचितांच्या  शैक्षणीक विकासासाठी मी वचनबध्द आहे, असे पाटील यांनी म्हटले.  

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि,  मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून, माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती.  आताही मी भीमा कोरेगाव ला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे, परंतु हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. मोठ्या प्रमाणात माझ्या माता, भगिनी, वयस्कर मंडळी, लेकरं तिथे श्रध्देने आले असतील, येत असतील तर त्यांची श्रद्धा व सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, असे पाटील यांनी  म्हटले. 

आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत. त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून विजयस्तंभास मानवंदना देणार आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मनसुबा मी पुर्ण होऊ देणार नाही आहे. सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group