उजनी बचाव संघर्ष समितीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेबाबत पुनर्विचार करून बैठक लावु संघर्ष समितीला आश्वासन
मुंबई प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्या नाहीत. मात्र बारामती आणि इंदापूर मतदार संघातील योजना पूर्ण करण्यासाठी दोन्ही सरकारचा अट्टहास सुरू आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने बारामती लोकसभा व इंदापूर विधानसभा वाचविण्यासाठी उजनी वर डोळा ठेवला. त्याच महाविकास आघाडी सरकारची रि ओडत सध्याच्या भाजप-शिवसेना सरकारने सोलापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसून लाकडी-निंबोडी योजनेसाठी निधी मंजूर करून निविदा काढण्यात आल्याने उजनी बचाव संघर्ष समितीने काल तातडीची बैठक घेत जिल्ह्यातील सर्व ११ आमदार आणि ३ खासदार मुग गिळून शांत असलेल्या या लोकप्रतिनिधींना बांगड्यांचा आहेर पाठविण्यात आला, त्यानंतर आज उजनी बचाव संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या उजनी बाबत कैफियत मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत पुनर्विचार करून लवकरच बैठक लावू असे आश्वासन दिल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या उजनी जलाशयावर फक्त सोलापूर जिल्ह्याचा अधिकार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील उपसा सिंचन योजना अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा हीच कैफियत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. यावर त्यांनी सविस्तर चर्चा करत जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन बद्दलची माहिती घेतली. शिवाय उजनीवर सोलापूर जिल्ह्याचा अधिकार असल्याचे त्यांनी आवर्जून अधोरेखित करत इंदापूर तालुक्यातील होऊ घातलेल्या लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेबाबत पुनर्विचार करू आणि याबाबत लवकरच बैठक लावू असे आश्वासन उजनी बचाव संघर्ष समितीला दिले.
दरम्यान यावेळी उजनी बचाव संघर्ष समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तुलसी हार घालून व श्री विठ्ठल रखुमाई ची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी समितीचे सचिव माऊली हळणवर, जनशक्तीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख मुबीना मुलाणी,समाधान सुरवसे, रामभाऊ तरंगे, राणा वाघमारे आदी उपस्थित होते.
- लवकरच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार
– सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी योजनेसाठी पाणी पळवण्याचा घाट जसा महाविकास आघाडी सरकारने रचला होता, त्याचप्रमाणे सध्याच्या भाजप सेना सरकारने बारामती लोकसभा व इंदापूर विधानसभा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या निधीबद्दल आम्हाला देणे घेणे नाही. मात्र आमच्या उजनी जलाशयातील पाणी आम्ही कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. ही बाब आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्ट केले आहे. याच अनुषंगाने लवकरच आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्यासमोर सोलापूर जिल्ह्याची कैफियत मांडणार आहोत. - माऊली हळणवर
सचिव, उजनी बचाव संघर्ष समिती चौकट 2
मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्याची अपेक्षा
– उजनी च्या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा करून सर्व माहिती जाणून घेतली. यावर बोलताना त्यांनी लाकडी निंबोडी योजनेसंदर्भात पुनर्विचार करू आणि बैठक लाऊ असे आश्वासन संघर्ष समितीला दिले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची मुख्यमंत्र्यांकडून मोठी अपेक्षा असून याबाबत ते नक्कीच सकारात्मक विचार करतील आणि सोलापूर जिल्ह्याला वाचवतील.- अतुल खूपसे-पाटील
अध्यक्ष, उजनी बचाव संघर्ष समिती
