करमाळ्यातील दत्त मंदिर ते कोर्ट रस्ता दुरुस्त करा अन्यथा २६ जानेवारी रस्ता खोदून बंद करणार जनशक्ती संघटनेने दिला इशारा
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील दत्त मंदिर ते न्यायालय सदरचा रस्ता बऱ्याच दिवसांपासून खराब झालेल्या अवस्थेत आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुळीचा सामना संपूर्ण शहराला करावा लागत आहे. तसेच शाळेसाठी जाणारे विद्यार्थी, अधिकारी, न्यायालय, वकील या सर्वांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. तरी या भागात परिसरात लवकर मंजूर निधी किंवा इतर वेगळ्या मार्गाने निधीची पूर्तता करून रस्ता करावा अन्यथा २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिवसाच्या सकाळी सदर रस्ता खड्डे खोदून रस्ता बंद करण्यात येईल असा इशारा जनशक्ती संघटनेने एका निवेदनाद्वारे दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही २६ जानेवारी रोजी रास्ता खोदून आंदोलन करणार असून वाहनांची वर्दळ कमी होईल जेणेकरून त्या ठिकाणी लोकांना श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. तसेच अपघातालाही निमंत्रणापासून वाचू शकतील. सदरचा निर्णय हा मी लोकांचा जीविताला धोका होऊ नये म्हणुन घेत आहोत. यात आम्हाला प्रशासनाला कोणताही त्रास द्यायचा नाही किंवा शासकीय मालमत्तेचा नुकसान करायचे नाही. परंतु बऱ्याच काळापासून सदरचा रस्ता हा कोणत्याच कार्यालयाकडून असल्याची माहिती दिली जात आहे. मग जर हा कोणत्याच कार्यालयाकडे रस्ता नसेल तर तो रस्ता नादुरुस्त अवस्थेत ठेवण्यापेक्षा बंद केलेला बरा त्यामुळे या बाबींचा विचार करून त्वरित काम करावे अन्यथा रस्ता खोदण्याचे आंदोलन निश्चित
केले जाईल. तसेच जर प्रशासनाला या रस्त्याचे काम करायचे नसेल तर हा रस्ता प्रशासनाने
जनशक्ती संघटनेस दत्तक दयावा. सदरील रस्त्याची दुरुस्ती आम्ही आमचे संघटनेमार्फत करण्यास
तयार असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे.यावेळी शरद एकाड, साहेबराव इटकर, किशोर शिंदे, रामराजे डोलारे, अक्षय देवडकर, कल्याण गवळी, रोहन नाईकनवरे ,अजीज सय्यद, राणा वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
