छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठीच्या निधीचे राजकारण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये
करमाळा प्रतिनिधी
करमाळाश नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी उपलब्ध झालेल्या निधीचे श्रेय घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उपलब्ध झालेला निधी हा श्रेयाचा विषय नसून याचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, अशा भावना करमाळा परिसरातील समस्त शिवप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.करमाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्यासाठी मान्यता मिळालेली आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा, यासाठी पूर्वीपासूनच राजकारण बाजूला ठेवून अनेक जण प्रयत्न करत होते व आहेत. बऱ्याच पाठपुराव्यानंतर शिवप्रेमींच्या परिश्रमाला यश आले असून आता पुतळ्यासाठी मान्यता मिळाल्यानंतर कोणीही पुढे येऊन या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. करमाळ्यातील शिवस्मारक समिती कधीही या कामासाठी कोणाचे वैयक्तिक नाव स्वतः पुढे करत नाही. त्यामुळे आपल्या राजकीय स्वार्थापोटी कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मान्यता अथवा निधीबाबत श्रेय घेत असेल तर शिवस्मारक समिती जशास तसे उत्तर देऊन त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शिवस्मारक समितीसह समस्त शिवप्रेमींनी यावेळी दिला आहे.
