शेतकरी हितासाठी आदिनाथ कारखाना हरिदास डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली चालला पाहिजे-वामनराव नवले
करमाळा प्रतिनिधी -शेतकऱ्यांच्या हितासाठी आदिनाथ पुढेही यशस्वीपणे चालवायचा असेल तर सहकाराचे मास्टरमाइंड असलेले हरिदास डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली किमान पुढील पाच वर्षे तरी कारखाना चालला पाहिजे, असे मत फुटजवळगाव येथील प्रगतीशील बागायतदार वामनराव नवले यांनी व्यक्त केले.
रविवार दि. २६ मार्च रोजी माढा तालुक्यातील फुटजवळगाव येथे आदिनाथ बचाव समितीचे अध्यक्ष हरिदास डांगे आणि पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. माजी पोलीस अधिकारी गोरख बाबु शंकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात ‘दत्तकला’ शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, प्रा. जयप्रकाश बिले, महेंद्र पाटील, जैनुद्दीन मुलाणी आदींनी आपले विचार मांडले. यावेळी कारखान्याचे कर्मचारी,ऊस उत्पादक सभासद, वाहतुकदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री. डांगे म्हणाले की, तालुक्यातील राजकारण्यांनी कारखान्याच्या बाबतीत विरोधाचे राजकारण न करता विकासाचे राजकारण करण्याची गरज आहे. सहकाराच्या दृष्टीने संचालक मंडळात एकवाक्यता असेल तर सद्य परिस्थितीत अजूनही कर्ज मिळू शकते आणि त्यातून इतर उत्पादने तयार करून कारखाना सहज उभारी घेऊ शकतो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिपक खोचरे पाटील यांनी केले तर युवा शेतकरी व प्रगतीशील बागायतदार योगेश नवले यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला खाडे सर, गणेश नवले, रतिलाल नवले, सुर्यकांत हांडे, विठ्ठल हांडे, संजय खोचरे, ट्रॅक्टर मालक वाघमोडे, कन्हेरगावचे केदार, विष्णू मोरे यांच्यासह समस्त फुटजवळगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
