डी.सी.सी.बँकेच्या कर्ज परतफेड ओटीएस योजनेला मुदतवाढ मिळावी : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज परतफेड ओटीएस योजनेला ३० जून पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे,सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांचेकडे केली आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जदार सभासदांकडील थकबाकी वसुलीसाठी व शेतकरी सभासदांना थकबाकी भरताना सवलत मिळावी या उद्देशाने एकरकमी परतफेड योजना अंमलात आणली.तसेच या योजनेत सहभाग घेतलेल्या वि.का.संस्थांच्या सभासदांना बँकेच्या धोरणानुसार पिक कर्ज वाटप करण्याचे धोरणदेखील अवलंबिले आहे. सदरची योजना शेतकरी सभासदांसाठी अतिशय चांगली, उपयुक्त व व्याजात सवलत मिळणारी आहे.या योजनेला कर्जदार सभासदांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे शेतकरी,वि.का.सोसायटी व पर्यायाने जिल्हा बँकेच्याही कर्ज थकबाकी वसुलीस चांगला हातभार लागलेला आहे.करमाळा तालुक्यातील कर्जदार सभासदांची आणखी ओटीएस योजनेत सहभाग घेण्याची इच्छा आहे परंतु करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बहुतांश साखर कारखान्यांनी गळीत हंगाम संपून बराचसा कालावधी लोटून देखील अद्यापही ऊस बिले अदा केलेली नाहीत. त्यामुळे कर्जदार सभासदांची ओटीएस योजनेत सहभाग घेण्याची इच्छा असताना देखील ते या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत.तरी शेतकरी हिताच्या या योजनेच्या मुदतवाढीचा विचार करून ३१ मार्च २०२३ रोजी वंचित राहिलेल्या सभासदांना या योजनेत सहभाग घेण्यासाठी ३० जून २०२३ अखेर पर्यत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केली आहे.