करमाळा तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा- माजी आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी तहसिलदार यांचेकडे केली आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून याबाबत माजी आमदार नारायण पाटील यांनी सर्वप्रथम आवाज उठवला आहे. तहसिलदार यांना दिलेल्या निवेदना बद्दल अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील पुर्व भाग हा पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईग्रस्त भाग म्हणून गणला जातो.हिसरे,हिवरे, फिसरे,साडे,शेलगाव (क),सालसे, आळसुंदे, वरकुटे, घोटी, निंभोरे, मलवडी, पाथुर्डी आदि गावांमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यरत नाहीत. यातील बहुतांश गावे ही जेऊरसह 29 गाव पाणीपुरवठा योजनेत समावेश असलेली गावे असून ही योजना बंद आहे. तसेच नेर्ले, रायगाव,भोसे, वंजारवाडी, जातेगाव, हुलगेवाडी, गोरेवाडी विहाळ, मोरवड आदि गावातही पिण्याच्या पाण्याची टंचाई दरवर्षी जाणवते. तर जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे आता कुठे काही गावात सुरु झाली असून यातील समाविष्ट विहीरींना किती पाणी लागेल हे आताच स्पष्ट नाही. यामुळे सध्या तातडीची गरज म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. तीव्र उन्हामुळे मागील चार महिन्यात भूगर्भातील पाणी पातळी खाली गेली आहे.यामुळे विहीरींचे पाणी आटले असुन बहुतांश कुपनलिका बंद पडल्या आहेत.तरी तहसिल प्रशासनाने तातडीने पाणी टंचाई बाबत या भागातील गावांचा अहवाल मागवून घ्यावा तसेच ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, तलाठी व मंडल अधिकारी यांच्या संयुक्त माहिती व अहवाला नुसार टँकरने पाणीपुरवठा करावा लागतील अशी गावे व वाडी वस्ती यांची नावे निश्चित करुन संबधित गावाकडून पाणी मागणी प्रस्ताव घेतले जावेत. पावसाने पाठ फिरवल्यास शासकीय प्रस्ताव, मंजुरी व बैठका, फेरसव्हेक्षण यात अधिक वेळ जाऊन नागरिकांना पाणी समस्येस तोंड द्यावे लागणार आहे. हि वेळ येऊ नये म्हणून पुर्वतयारी केली जावी व वेळीच अशा गावांना व वाडी वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन हाती घेतले जावे अशी मागणी आपण या निवेदनाद्वारे केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
