लोकमान्य टिळक तरूण मंडळाच्यावतीने वर्षी गणेश भक्तासाठी विविध सामाजिक उपक्रम मेजवानीचे आयोजन – अध्यक्ष सागर गायकवाड
करमाळा प्रतिनिधी :- सार्वजनिक गणेशोत्सव 2024 करिता विविध मंडळे सज्ज झालेली असून गल्लोगल्ली मंडप, स्टेज, विद्युत रोषणाईने परिसर भक्तीमय झालेला आहे. करमाळा शहरातील किल्ला विभाग येथील मानाचा तिसरा गणपती म्हणून ओळख असलेल्या लोकमान्य टिळक तरूण मंडळाने या वर्षी विविध सामाजिक उपक्रमांची मेजवानी भक्तांसाठी आयोजित केलेली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सागर गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, यावर्षी मंडळाच्या वतीने आम्ही विविध उपक्रमांचे आयोज केले असून यामध्ये प्रथम दिनी नारी शक्ती सन्मान अंतर्गत महिलांना प्रतिष्ठापना मिरवणूकीमध्ये सहभागी करून घेत आहोत तसेच दुसऱ्या दिवशी मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीराचे आयोजन केलेले आहे. तसेच माणुसकीची भिंत अंतर्गत अनाथ आश्रमातील बालकांसाठी चांगल्या प्रतिचे कपडे देणार आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा व बुध्दीमत्ता परीक्षा यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर सध्याच्या काळाचा विचार करून लहान मुली, मुले सुरक्षित राहणे गरजेचे असल्याने त्यांना गुड टच, बॅड टच इ. चे व वेळप्रसंगी स्वत:चे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजनही केलेले आहे. तसेच धार्मिक कार्यक्रम म्हणून भजनाच्या कार्यक्रम घेतला जाणार असून महिलांकरिता क्विन ऑफ किल्ला अंतर्गत विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तसेच आपल्या ताटातील एक घास या अभियाना अंतर्गत निराधारांसाठी धान्य संकलित करून ते निराधारांसाठी वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिवंत देखाव्याचे ही आयोजन केलेले असून शेवटच्या दिवशी पाणी प्रदूषित होवू नये याकरिता निर्माल्य दान हा उपक्रम राबविला असून भव्य दिव्य अशी लाकडी घोडयावरून श्री. गणेशाची विसर्जन मिरवणूक काढणार असल्याचेही यावेळी अध्यक्ष गायकवाड यांनी सांगितले.
सदरचे सर्व कार्यक्रम हे उपाध्यक्ष अनिकेत चोरगे, सचिव गणेश शिंदे, खजिनदार अभिजीत कारंडे, मिरवणूक प्रमुख वासुदेव ढोके, कार्याध्यक्ष भोलेनाथ ननवरे व लोकमान्य टिळक तरूण मंडळाचे आजी माजी व युवा सदस्यांच्या सहकार्याने होत आहेत.
