करमाळ्यात नागेशदादा कांबळे महायुती व महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत…
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील जनाधार असलेले आरपीआय चे नेते नागेशदादा कांबळे हे महायुती व महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मागासवर्गीय समाजाने संविधानाच्या मुद्द्यावर भाजप ला विरोध करत महाविकास आघाडीला मतदान केले.परंतु महाविकास आघाडीने नंतर मात्र राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले तसेच सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्रात आयात मागासवर्गीय उमेदवार राखीव जागावर दिले.तसेच चळवळीतल्या लोकांचा विचार केला नाही याचाच रोष म्हणून करमाळा तालुक्यात आपण एक प्रयोग करण्याच्या विचारात असून महाविकास आघाडी व महायुती या दोन्हींना अद्दल घडवण्यासाठी त्यांना मतदान न करता ताकद दाखविणार असल्याचे बॅनर्स सोशल मीडियातून नागेशदादा कांबळे मित्र परिवाराच्या नावे फिरत आहेत.
कांबळे यांना यासंबंधी विचारले असता आज गुरुवार दि ७/११/२४ रोजी सायं ५ वा आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद असून त्यात आपण सविस्तरपणे आपली भूमिका मांडणार आहोत असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
नागेशदादा कांबळे हे बहुजनवादी चळवळीतील मोठे नाव असून त्यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्यात आहे.नुकत्याच त्यांनी काढलेल्या संविधान बचाव मोर्चा ला त्यांच्या हाकेला ओ देत करमाळ्यात हजारोंची रेकॉर्डब्रेक गर्दी स्वयंस्फूर्तीने जमा झाली होती.नागेशदादा कांबळे यांच्या भूमिकेमुळे आधीच चुरशीची होत असलेली ही निवडणूक अधिक चुरशीची होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
