समरसतेची वारी… साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी… साहित्यिकांची घरी’* या उपक्रमाचा शुभारंभ
सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी… साहित्यिकांच्या घरी*
समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी… साहित्यिकांची घरी’* या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कवी रा. ना. पवार यांचे चिरंजीव आणि कवितेतील सर्व प्रकार ज्यांनी आतापर्यंत हाताळले ते *कवी माधव पवार* यांची भेट घेऊन संवाद साधण्यात आला. वेदनेची मजा लुटत काव्य प्रांत गाजविणार्या माधव पवार यांच्या कवितांच्या प्रवासाबरोबर विनोद, नकला, आर्केस्टा, कुस्ती, तालीम, मित्र परिवार, गीत, छंद, आवडी-निवडीबरोबरच साहित्य विश्वातील बदलत्या विषयांवर मनमुराद गप्पा रंगल्या. ११ वर्षांमध्ये तब्बल १ हजार ४३४ वेळा ज्यांना डायलेसिसचा सामना करावा लागला. ते संघर्षयात्री आणि वेदनेवर विजय मिळविलेल्या कवी पवारांनी आपल्या जीवनातील संघर्ष, नावलौकिक, वडिलांचा वारसा आणि आपला जीवनपट यावेळी मांडला. त्यांनी समरसता साहित्य परिषदेच्या उपक्रमाचे कौतुक तर केलेच. शिवाय साहित्य क्षेत्रातील असा अनुभव मी पहिल्यांदाच अनुभवल्याचे सांगत ते भारावूनही गेले. आजपर्यंत पु. ल. देशपांडे, सुरेश भट, आनंद यादव, कवी ग्रेस, ना. धो. महानोर, म. फु. शिंदे, विठ्ठल वाघ, रामदास फुटाणे, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्यासह असंख्य दिग्गज कवी, साहित्यिकांनी घरी घेऊन भेट घेतली. पण समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र शाखेची ही भेट मला अविस्मरणीय ठरणारी आहे, असे त्यांनी सांगितले. सोलापुरात झालेल्या संमेलनात कवीसंमेलनामध्ये मी सहभागी झालो होतो, हेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी, उपाध्यक्ष अरविंद मोटे, कार्यवाह देवेेंद्र औटी, सांस्कृतिक आयाम प्रमुख प्रा. पुरुषोत्तम बगले, पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी, ग्रंथालय आयाम सहप्रमुख नागराज बगले, युवती आयाम प्रमुख रुपा कुताटे, प्रकाशन आयाम प्रमुख यशवंत बिराजदार, प्रसिद्धी आयाम प्रमुख पिंटू विभूते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.