करमाळा

भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

 

करमाळा प्रतिनिधी :- भारताच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर अमीट ठसा उमटविणारे भारतरत्न, थोर राष्ट्रपुरुष स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संजयजी घोरपडे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात श्रद्धेय अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली,
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, नगरसेवक रामभाऊ ढाणे, नगरसेवक दीपक चव्हाण, गणेश महाडिक, संताजी घोरपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय आण्णा घोरपडे यांनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनचरित्रावर सविस्तर मार्गदर्शन केले. “अटलजी हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते संवेदनशील कवी, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या भावना जाणणारे लोकनेते होते. पक्षनिष्ठा राखत देशहित सर्वोच्च मानणारे त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे आहेत,” असे ते म्हणाले. अटलजींच्या प्रेरणेने भविष्यात करमाळा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित नगरसेवक रामभाऊ ढाणे व दीपक चव्हाण यांचा श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देत अटलजींच्या आदर्शावर काम करण्याचा संकल्प यावेळी नगरसेवक रामभाऊ ढाणे व दीपक चव्हाण यांनी व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रमात राष्ट्रभक्ती, विचारांची प्रेरणा आणि अटलजींच्या आठवणींमुळे वातावरण भावूक झाले होते. “अटलजी अमर आहेत त्यांच्या विचारांमुळे,” अशा भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमातून अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार, कार्य आणि राष्ट्रप्रेम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!