Thursday, August 6, 2026
Latest:
करमाळा

विद्यार्थ्यांचे अभिनय कौशल्य आणि भक्तिरस: दत्तकला इंटरनॅशनलमध्ये रामायणावर आधारित अद्भुत स्नेहसंमेलन संप्पन

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूलमध्ये रामायण या पवित्र व संस्कारक्षम संकल्पनेवर आधारित भव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे संपूर्ण प्रेक्षागृह भक्तिरसाने ओथंबून गेले आणि उपस्थित प्रेक्षकांना अध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच वातावरण भक्तिमय होते. विद्यार्थ्यांनी रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण नाट्य, संवाद, संगीत व भावपूर्ण अभिनयाच्या माध्यमातून केले. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान व रावण यांची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनयकौशल्य आणि नाट्यनिपुणता दाखवली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ, संस्थेच्या पदाधिकारी सौ. सारिका झोळ, सौ. जयमाला बांदल, श्री. धनंजय अडसूळ, श्री. लालासाहेब जगताप, सौ. कौशल्यादेवी जगताप, तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, शाळेच्या संचालिका सौ. नंदा ताटे आणि शाळेच्या प्राचार्या सौ. सिंधू यादव.
कार्यक्रमप्रसंगी प्रा. रामदास झोळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या तांत्रिक व स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून आध्यात्मिक संस्कारांचीही नितांत गरज आहे. त्यांनी अधोरेखित केले की, रामायण व भगवद्‌गीता हे अमूल्य धर्मग्रंथ आहेत आणि त्यातील विचार, मूल्ये व जीवनदर्शन विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ‘मॅन्युअल’ प्रमाणे वापरले पाहिजे. सत्य, कर्तव्य, संयम, त्याग व नीतिमूल्ये अंगीकारल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल.
सचिव सौ. माया झोळ व अन्य मान्यवरांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले व असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्यास अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. शाळेच्या संचालिका सौ. नंदा ताटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्या, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
रामायणाच्या माध्यमातून साकारलेला हा संस्कारक्षम कार्यक्रम विद्यार्थ्यांसह पालक व उपस्थित प्रेक्षकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवून गेला. उपस्थितांनी कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!