Uncategorized

उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार प्रशासनावर वचक असलेल्या नेतृत्वाला महाराष्ट्राला मुकले माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिला आठवणीना उजाळा

करमाळा | प्रतिनिधी
अजितदादांच्या दुर्दैवी निधनाची धक्कादायक वार्ता समजताच संपूर्ण राजकीय वर्तुळासह सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. प्रशासनावर ठाम वचक ठेवणारे, कार्यकर्त्यांना ताकद देणारे आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेले अजित दादा यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रभावी नेता गमावला असल्याची भावना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केली.
जयवंतराव जगताप म्हणाले, “अजित दादा आणि मी जवळपास समवयस्क होतो. आमचे मैत्रीचे आणि अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. विशेष म्हणजे आमचा राजकारणातील प्रवेशही जवळपास एकाच काळात झाला. मी १९९० साली विधानसभेवर तर अजित दादा १९९१ साली लोकसभेवर निवडून आले.”
पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला तो काळ आठवताना जगताप म्हणाले की, “त्या काळात मी, जयंत पाटील, सुभाष कुल यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्ते एकत्र काम करत होतो. महाराष्ट्र सरकार असो, राज्य सहकारी बँक असो किंवा संपूर्ण सहकार क्षेत्र—अजित दादांचा प्रचंड दरारा होता. प्रशासनावर त्यांचा ठाम वचक सर्वश्रुत होता.”
कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा नेता म्हणून अजित दादांची ओळख होती. “कार्यकर्त्यांना ताकद देणारा, त्यांना आत्मविश्वास देणारा अजित दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही,” असे स्पष्ट मत जगताप यांनी व्यक्त केले.
आपले वैयक्तिक अनुभव सांगताना ते म्हणाले, “मी दोन वेळा आमदार असताना, तसेच सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीदरम्यान आणि आदिनाथ संस्थेचा चेअरमन असताना, शिखर बँकेच्या माध्यमातून अजित दादांनी केलेली मोलाची मदत करमाळा तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही.”
अजितदादांच्या निधनाने सहकार, प्रशासन आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांमध्ये न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत जयवंतराव जगताप यांनी पवार कुटुंबीयांच्या दुःखात आपण व्यक्तिशः सहभागी असल्याचे सांगितले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!