Saturday, September 19, 2026
Latest:
करमाळा

अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राला मोठा धक्का – माजी आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अनुभवी नेतृत्व अजितदादा पवार यांच्या राजकीय जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून हा धक्का अनपेक्षित आहे, अशी भावना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. राज्य, जिल्हा आणि विशेषतः करमाळा तालुक्याचे त्यामुळे न भरून येणारे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
संजयमामा शिंदे म्हणाले की, मी निमगाव गावचा सरपंच असताना अजितदादांचा पहिला सत्कार केला होता. त्या क्षणापासून आमचे वैयक्तिक व भावनिक नाते निर्माण झाले. राजकीय संबंधांपलीकडे जाऊन हे नाते अधिक दृढ झाले होते. रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी हक्काने त्यांच्याशी संवाद साधता येत असे. अडचणी मांडल्या की त्यावर निश्चित मार्ग काढण्याची त्यांची कार्यपद्धती होती.
“राजकारणापेक्षा माझे अजितदादांशी भावनिक नाते अधिक घट्ट झाले होते. त्यामुळेच मी त्यांना माझा नेता मानत होतो,” असे स्पष्ट करताना शिंदे यांनी अजितदादांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले. सकाळी सहा वाजल्यापासून ते कामाला सुरुवात करत असत. स्पष्ट दृष्टीकोन, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची पकड ही त्यांची ओळख होती.
करमाळा मतदारसंघासाठी अजितदादा पवार यांनी एका पंचवार्षिक योजनेतून सुमारे ३,५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे तालुक्यातील विकासाला मोठी चालना मिळाली, असेही शिंदे यांनी नमूद केले.
यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सीना नदीकाठच्या भागाची पाहणी करण्यासाठी अजितदादा करमाळा तालुक्यात आले होते. नदीपलीकडील अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे लक्षात येताच, त्या ठिकाणी मोठा पूल उभारण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्याबाबत तात्काळ नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
“राज्य आणि जिल्ह्याचे नुकसान तर झालेले आहेच, पण करमाळा तालुक्याचे नुकसान अधिक तीव्रतेने जाणवणार आहे,” अशी भावना व्यक्त करत संजयमामा शिंदे यांनी अजितदादा पवार यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिशादर्शक होते, असे सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!