Friday, March 6, 2026
Latest:
करमाळा

आदरणीय स्व. अजितदादांच्या स्मृती मनात कायम ठेवुन त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणार” — मा. आ. संजयमामा शिंदे

माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात माननीय स्वर्गीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली झाली, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आयुष्य घडवणारी गोष्ट आहे. घरातून आदरणीय वडिलांचे आणि बंधू बबनदादांचे आशिर्वाद लाभले; पण राजकारणात धैर्याने उभे राहण्याची ताकद, जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती आणि जनतेसाठी अखंड झटण्याची प्रेरणा मला अजितदादांकडून मिळाली.
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या; परंतु माझ्यासाठी ते केवळ पदावरील नेते नव्हते, तर ते मार्गदर्शक, वरदहस्त आणि प्रेरणास्थान होते. त्यांचे अचानक झालेले दुःखद निधन आजही मनाला पटत नाही. प्रचाराच्या निमित्ताने दौऱ्यावर असताना त्यांच्या विमानाचा झालेला अपघात आणि तो काळाकुट्ट दिवस आयुष्यभराची सल देऊन गेला.
अजितदादांची कार्यशैली वेगळीच होती. जय-पराजय, यश-अपयश या गोष्टींना न डगमगता स्वीकारत ते कायम लोकसंपर्कात राहिले. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, प्रत्येक दिवसाचे अचूक नियोजन करत, कामात अद्ययावत राहणे हा त्यांचा स्वभाव होता. व्यवसाय, राजकारण आणि समाजकारण यांना समान महत्त्व देत त्यांनी प्रत्येक क्षण समाजासाठी जगला. त्यांच्या तालमीत असंख्य कार्यकर्ते घडले — मी त्यापैकी एक असल्याचा मला अभिमान आहे.
सोलापूर जिल्ह्यात येताना त्यांचा प्रेमळ आणि आत्मीयतेने भरलेला फोन अजूनही कानात घुमतो — “संजय, मी उद्या सकाळी येतोय… काल सांगितलेल्या कामांची कागदपत्रे तयार ठेव… बोलू निवांत!” हे शब्द आता पुन्हा कधी ऐकायला मिळणार नाहीत, ही जाणीव असह्य आहे. नगोर्लीच्या फार्महाऊसवर वेळेवर येणारा त्यांचा ताफा, कामावरची चर्चा, आणि पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप — या आठवणी कायम मनात कोरलेल्या आहेत.
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही. मात्र त्यांनी दिलेला एक संदेश कायम स्मरणात आहे — “थांबायचे नाही.” आज दादा आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची विकासदृष्टी आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी आपण जिवंत ठेवली पाहिजे.
सोलापूर जिल्हा, करमाळा आणि माढा तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने स्व. अजितदादांचे विचार आत्मसात करून विकासाचे राजकारण पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द — जो दादांचा वादा असायचा — तो पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू.
“काम करत आलोय आणि काम करत राहू” हा त्यांचा मुलमंत्र जपत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा माझा ठाम निर्धार आहे.
हीच स्व. अजितदादांना विनम्र आदरांजली.
— मा. आ. संजयमामा विठ्ठलराव शिंदे
करमाळा विधानसभा

error: Don\'t try to copy. Content is protected !!