Tuesday, April 7, 2026
Latest:
करमाळा

करमाळा शहरातील नागरिकांसाठी शुद्ध पाणी देण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून कै. बाबुराव गायकवाड प्रतिष्ठानच्या आरओ पाणी प्रकल्पाचे लोकार्पण

करमाळा, प्रतिनिधी : शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठान, करमाळा यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरओ फिल्टर पिण्याच्या पाण्याच्या प्लांटचे गुरुवारी दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती चौक, भवानी नाका येथे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
या प्रकल्पाचे उद्घाटन शहरातील पत्रकार बांधवांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचे सांगितले. नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, प्रतिष्ठानने उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सदर आरओ प्रकल्पामुळे करमाळा शहरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांना केवळ एक रुपयात एक लिटर पाणी तसेच दहा रुपयांत पूर्ण पाण्याचा जार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाद्वारे गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला होता. तसेच आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक कार्यातून प्रतिष्ठानने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या नव्या उपक्रमामुळे करमाळा शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी होणार असून, नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यातही मदत होणार आहे. समाजहितासाठी प्रतिष्ठान करत असलेले कार्य प्रेरणादायी असून, भविष्यातही अशाच उपक्रमांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!