Saturday, June 20, 2026
करमाळा

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल यांचा अनोखा उपक्रम

करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या ही चिंतेची बाब बनत असताना मांगी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते सुजित (तात्या) बागल यांनी शाळा वाचविण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी स्वतः भरून ते शिक्षणाबाबत जनजागृती करत आहेत.मांगी गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी सुजित बागल गेल्या वर्षभरापासून सातत्याने प्रयत्नशील आहेत. मागील वर्षी त्यांनी गावासह पंचक्रोशीतील पालकांना आपल्या मुला-मुलींना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २० पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत घेतला होता. त्या सर्व २० पालकांची घरपट्टी सुजित बागल यांनी स्वतः ग्रामपंचायतीमध्ये भरली.यावर्षीही हा उपक्रम सुरू ठेवत जवळपास १८ पालकांनी आपल्या मुला-मुलींचा प्रवेश मांगी जिल्हा परिषद शाळेत घेतला आहे. या सर्व पालकांची घरपट्टीदेखील सुजित बागल स्वतः भरणार आहेत.सुजित बागल हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असून विविध लोकहिताचे उपक्रम राबवत आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मागील दोन-तीन वर्षांत त्यांनी हजारो वृक्षांची लागवड केली आहे. येणाऱ्या काळात मांगीसह परिसरात किमान पाच हजार पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

“विद्यार्थ्यांच्या कमी पटसंख्येमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद पडू नयेत, यासाठी यापुढेही मी तन, मन आणि धनाने कार्यरत राहणार आहे. गावखेड्यातील प्रत्येक पालकाने आपल्या मुला-मुलींना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश द्यावा,” असे आवाहन सुजित बागल यांनी केले.

यावेळी मांगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वीर, वैशाली शेटे, सुनिता काळे, आशा देमुंडे, निखिल बागल, आण्णासाहेब बागल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!