करमाळा शहरातील पाणी जपून वापरा; भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे -नगराध्यक्षा मोहिनी सावंत
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करावा, असे कळकळीचे आवाहन करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत यांनी केले आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी करमाळा नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
नगराध्यक्षा सावंत यांनी नागरिकांना पाणी वापराबाबत काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक कामांसाठी करावा, पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, गाडी धुणे, बागेला अतिरिक्त पाणी देणे तसेच इतर अनावश्यक वापर टाळावा. घरातील गळती असलेले नळ व पाइपलाइन तात्काळ दुरुस्त करावेत. तसेच बेकायदेशीर पाणी उपसा करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“पाणी ही अमूल्य संपत्ती आहे. आजची बचत म्हणजे उद्याचे सुरक्षित भविष्य आहे,” असे सांगत नगराध्यक्षा सावंत यांनी पाणी बचतीसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
करमाळा शहरातील सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळेच भविष्यातील पाणीटंचाई टाळणे शक्य होणार असल्याचे सांगत, नगराध्यक्षा सौ. मोहिनी ताई संजय सावंत, उपनगराध्यक्ष मा. अतुल फंड आणि पाणीपुरवठा सभापती विक्रमसिंह परदेशी यांनी नागरिकांना पाण्याचे योग्य नियोजन करून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.


