Friday, August 21, 2026
Latest:
Uncategorized

ऊजनीवरील तीन पूल म्हणजे विकासाचा महामार्ग; पर्यटन व उद्योगांसाठी सुवर्णसंधी – ॲड. अजित विघ्ने करमाळा-इंदापूर दरम्यान ७७७ कोटींच्या पुलांमुळे उजनी परिसराच्या विकासाला मिळणार नवी गती


करमाळा, प्रतिनिधी : भीमा नदीवरील उभारण्यात येत असलेले तीन महत्त्वाचे पूल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून उजनी परिसराच्या सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार ठरणार आहेत. या पुलांमुळे पर्यटन, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार असून परिसराच्या आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांनी व्यक्त केला.
करमाळा आणि इंदापूर तालुक्यांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील तीन पुलांची कामे विविध टप्प्यांत सुरू आहेत. कोंढार-चिंचोली ते डिकसळ या मार्गावरील नवीन पुलासाठी ५५ कोटी रुपये, कुगाव ते शिरसोडी पुलासाठी ३८२ कोटी रुपये आणि चांडगाव ते पोमलवाडी पुलासाठी ३४० कोटी रुपये असा एकूण सुमारे ७७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ॲड. विघ्ने म्हणाले, “या पुलांमुळे करमाळा आणि इंदापूर तालुक्यांतील अनेक गावांमधील अंतर कमी होणार आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर उजनी परिसरात पर्यटन विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, नीलकंठेश्वर (कात्रज), किर्तेश्वर (केत्तूर), कोटलिंग (चिखलठाण), हनुमान मंदिर (कुगाव) यांसारखी धार्मिक स्थळे तसेच उजनी जलाशय परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. कृषी पर्यटन, बोटिंग सेंटर, हॉटेल्स, कॉटेज, लॉजिंग व इतर पर्यटनपूरक उद्योग उभारल्यास स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
या विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दत्तामामा भरणे आणि करमाळा मतदारसंघाचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याचेही ॲड. विघ्ने यांनी कौतुक केले.
“विकासकामांसोबतच गावोगावी स्वच्छता, हरित उपक्रम आणि पर्यटनपूरक सुविधा निर्माण करण्यावर भर दिल्यास उजनी परिसर महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकेल. या विकास प्रक्रियेत सर्व ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी आणि युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहनही ॲड. अजित विघ्ने यांनी केले.
या तिन्ही पुलांच्या माध्यमातून उजनी परिसरातील विकासाला नवी दिशा मिळणार असून भविष्यात हा भाग पर्यटन, व्यापार आणि उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!